आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आता केवळ काही महिनेच शिल्लक आहे. यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघाने त्यांचा १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला. तर इतर संघातील अनेक खेळाडू आपल्या संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. भारतीय संघ देखील लवकरच आपला १५ सदस्यीय संघ जाहीर करेल. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता अश्विनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुंदरला इंग्लंड दौऱ्यात सराव सामन्यादरम्यान बोटाला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला मायदेशात परतावे लागले. तो त्या दुखापतीतून अजूनही सावरला नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता भारताचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज अश्विनला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळू शकते.
सुंदरने दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्यातून देखील माघार घेतली आहे. सुंदर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजेस बेंगलोर (आरसीबी) संघाकडून खेळतो. सुंदर आरसीबीचा एक प्रमुख खेळाडू आहे. त्यामुळे आरसीबीच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
तसेच, सुंदरला आयपीएल न खेळता टी-२० विश्वचषकात खेळवणे, जरा कठीण आहे. म्हणून, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुंदरऐवजी १५ सदस्यीय संघात अश्विनची निवड होऊ शकते. दोघेही फिरकीपटू गोलंदाज आहेत. त्या दोघांची गोलंदाजीची शैली देखील एकसारखीच आहे. तसेच फलंदाजीत देखील दोघे चांगले योगदान देऊ शकतात. त्यामुळे अश्विनला सुंदरचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
अश्विनने भारतीय संघाकडून खेळताना ४६ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६.९७ च्या इकॉनॉमी रेटने ५२ विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. अश्विन अखेरचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना जुलै २०१७ मध्ये खेळला आहे. त्यानंतर त्याला भारताकडून टी२० सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने ही स्पर्धा यूएई आणि ओमानला घेण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तसेच स्पर्धेतील गट आणि वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
अ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघ आहेत. तर उर्वरित २ संघ पात्रता फेरीतून निवडण्यात येणार आहे. तसेच ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे तर २ संघ पात्रता फेरीतून निवडण्यात येणार आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोंबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–उंच उडीमध्ये भारताला ‘दुहेरी’ यश! मरियप्पणने पटकावले ‘रौप्य’, तर शरदच्या नावे ‘कांस्य’
–अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव
–एकही दिल कितनी बार जितोगे! ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट