ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने सध्याच्या भारतीय संघाचे तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.
वॉटसन चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ‘विराटने भारतीय संघाबरोबर चांगले काम केले आहे. तो सर्व क्रिकेटप्रकारात चांगली कामगिरी करत आहे. तो आत्ता जे काही करत आहे त्याचा फायदाच होत आहे आणि संघही त्याच्या नेतृत्वाला चांगली साथ देत आहे.’
तसेच ऑस्ट्रेलियाने एकेकाळी स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे क्रिकेट जगतावर वर्चस्व गाजवले, त्याप्रमाणे भारतीय संघ क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवू शकतो असे विचारल्यावर वॉटसन म्हणाला, ‘त्याची पुनरावृत्ती करणे कठिण आहे. पण भारतीय संघ असे करु शकतो. त्यांनी असे वर्चस्व प्रस्तापित न करण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.’
तसेच सध्याच्या भारतीय संघाबद्दल 38 वर्षीय वॉटसन म्हणाला, ‘भारतीय संघाकडे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबींमध्ये चांगली व्याप्ती आहे.’
‘भारतीय संघात असलेली ही खोली मजबूत आहे. ज्यामुळे रोहित शर्मा सारख्या खेळाडूला सलामीला पाठवून मोठ्या धावा करण्याचा फायदा उठवता येतो. मला खात्री आहे हा संघ परदेशातही सामने जिंकू शकतो.’
भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाने मायदेशात सलग 11 वा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी असा पराक्रम कोणालाही करता आलेला नाही
याआधी ऑस्ट्रेलियाने 2 वेळा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. पण दोन्हीवेळेस सलग 11 व्यांदा कसोटी मालिका जिंकण्यात त्यांना अपयश आले आहे.