आयसीसी महिला विश्वचषकातील १७ वा सामना शुक्रवारी (१८ मार्च) बांगलादेश वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश संघात झाला. हा सामना वेस्ट इंडिजने ४ धावांनी जिंकला. असे असले, तरीही सामन्यादरम्यान धक्कादायक घटना घडली. वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कोनेल बांगलादेश संघाच्या डावादरम्यान अचानक मैदानावर कोसळली. त्यामुळे तिला मैदानातून तातडीने रुग्णालयात घेऊन जावे लागले. शमिलिया कोनेल मैदानावर अचानक का कोसळली? यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

झाले असे की, बांगलादेशच्या डावाच्या ४७व्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना शमिलिया (Shamilia Connell) जेव्हा मैदानावर कोसळली, तेव्हा तिचे संघसहकारी तिच्या दिशेने धावल्या. त्यानंतर कोनेल आपल्या पोटावर हात ठेवून स्वत:च रुग्णवाहिकेत बसली. रुग्णालयात जाण्यापूर्वी मैदानावरच वैद्यकीय पथकाने तिची तपासणी केली. त्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला होता.

https://twitter.com/TheBluesIndia_/status/1504677084643282944?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1504677084643282944%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-shamilia-connell-collapses-on-field-in-ban-vs-wi-match-fellow-players-showed-courage-taken-to-hospital-by-ambulance-6056902.html

विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंनी कठीण परिस्थितीतही आपले धैर्य गमावले नाही. त्यांनी कमी धावसंख्येचा यशस्वीरीत्या बचावर करत आपल्या संघाला महिला विश्वचषक क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध ४ धावांनी शानदार विजय मिळवून दिला.

यावेळी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने ९ विकेट्स गमावत निर्धारित ५० षटकात १४० धावा ठोकल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी ८ धावांची आवश्यकता होती. मात्र, संघाने ४९.३ षटकात सर्व विकेट्स गमावत १३६ धावांवरच नांग्या टाकल्या.

यावेळी बांगलादेशकडून फलंदाजी करताना फक्त ४ फलंदाजांना २० धावसंख्या पार करता आली. याव्यतिरिक्त तब्बल ५ फलंदाज शून्य धावसंख्येवर तंबूत परतले. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना हेली मॅथ्यूजने बांगलादेशच्या सर्वाधिक ४ फलंदाजांना तंबूत धाडलं. तसेच, ऍफी फ्लेचर आणि कर्णधार स्टेफनी टेलर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक शेमेन कॅम्पबेलने नाबाद सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली होती. या धावा करताना तिने ५ चौकारही ठोकले. तिच्याव्यतिरिक्त फक्त ३ फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या पार करता आली. यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना सलमा खातून आणि नाहिदा अक्तर यांनी प्रत्येकी २, तर जहनारा आलम, रुमाना अहमद आणि रितू मोनी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

वेस्ट इंडिजची पाच सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. हा संघ गुणतालिकेत भारतीय संघाला पछाडत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. बांगलादेश संघाला ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे.