इंंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये (आयपीएल) बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या या थरारक सामन्यात बेंगलोरने लखनऊला १४ धावांनी पराभूत करत दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचे तिकीट मिळवले आहे.
नाणेफेक हरल्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोर संघाच्या पहिल्या दोन विकेट्स लवकर पडल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारचे (Rajat Patidar) तडकाफडकी नाबाद शतक आणि हर्षल पटेलची अप्रतिम गोलंदाजी या दोन बाबी या सामन्याच्या विजयात विशेष ठरल्या. म्हणून संघाच्या या विजयाचे श्रेय कर्णधार फाफ डु प्लेसीने या दोघांना दिले आहे.
विराट कोहली आणि डु प्लेसी बाद झाल्यावर बेंगलोर संघ अडचणीत आला होता. नंतर आलेल्या पाटीदारने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावांची अविश्वसनीय खेळी केली. तर पुन्हा एकदा दिनेश कार्तिकने २३ चेंडूत ३७ धावांची झटपट खेळी केल्याने बेंगलोरने २० षटकात ४ बाद २०७ धावांचा डोंगर उभारला.
या सामन्यात २०७.४१च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या पाटीदारने त्याच्या डावात १२ चौकार आणि ७ षटकार फटकारले. “आजच्या सामन्यात थोडा दबाव जाणवत होता. पण रजतने ज्या प्रकारे या सामन्यात त्याचे शतक पूर्ण केले ते पाहून मी अचंबित झालो”, अशा शब्दात डु प्लेसीने त्याचे कौतुक केले आहे.
“मी आतापर्यत जेवढ्या आयपीएलमधील फलंदाजांंच्या खेळी पाहिल्या त्यातील ही आतापर्यंतची उत्तम खेळी आहे. त्याने फलंदाजी करताना अनेक अप्रतिम शॉट्स मारले. तो पुढे एक चागंला फलंदाज होईल यात शंकाच नाही”, असेही डु प्लेसीने पाटीदारबद्दल म्हटले आहे.
या छोट्या मैदानावर लक्ष्याचा बचाव करणे सोपे नाही. मात्र आमच्या गोलंदाजांनी एकाग्र राहून चांगली गोलंदाजी केली. त्यातच हर्षल पटेलने डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने टाकलेले १८वे आणि २० वे षटक या सामना विजयासाठी मोलाचे ठरले. त्याने ४ षटकांमध्ये २५ धावा देत एक विकेट मिळवली. त्याला बाकीच्या गोलंदाजांनी योग्य ती साथ दिली.
“माझ्यात आणि पटेलमध्ये जेव्हा पहिल्यांदा चर्चा झाली, तेव्हा त्याने दबावामध्ये गोलंदाजी करण्याची इच्छा दर्शवली होती. यामुळे मला दबाव आला की मी त्याच्या हातात चेंडू देतोय”, अशा शब्दांत डु प्लेसीने पटेलच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्लाॅग- देश का गौरव : राहुल-सौरव
Eliminator | लखनऊचं नेमकं काय चुकलं? कर्णधार राहुलने सांगितले आरसीबीविरुद्धच्या पराभवामागचे कारण
आठवणीतील सामना: २३ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम