भारत आणि ऑस्ट्रेलिया. सध्या क्रिकेटविश्वातील दोन सर्वात आक्रमक संघ. हे दोन्ही संघ केवळ आपल्या वर्तनातून नव्हेतर खेळातही कमालीची आक्रमकता दाखवतात. एकप्रकारे या दोन्ही संघांमध्ये सध्या क्रिकेट जगतातील वर्चस्वाची अप्रत्यक्ष लढाई सुरू आहे. भारतीय क्रिकेटची नवी पिढी इतकी आक्रमक बनलीये. ते अगदी सहजपणे कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून खेळताना दिसतात. मात्र, 70 च्या दशकात असे नव्हते. भारतीय खेळाडू जेंटलमन्स गेमचा आदर करायचे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघात ती आक्रमकता अगदी पहिल्यापासून भिनलेली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्लेजिंगचा एखाद्या हत्यारासारखा वापर व्हायचा. समोरच्या संघाला खाली दाबण्याचा प्रयत्न ते नेहमी करत आणि त्यात यशस्वी देखील होत. मात्र, काहीवेळा त्यांचा स्लेजिंगचा हा डाव त्यांच्यावरच उलटत. 1978-1979मध्ये टीम इंडियाचे ओपनर चेतन चौहान यांनी ऑस्ट्रेलियन पेसर जेफ थॉमसन यांच्या धमकीला न घाबरता त्यांना सडेतोड उत्तर दिल्याची ही कहाणी.
सन 1977-1978 मध्ये बिशनसिंग बेदींच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला गेली. 5 टेस्टची ही लांबलचक सीरिज होती. जवळपास तीस वर्षापासून ऑस्ट्रेलियात खेळायला जात असलेल्या टीम इंडियाला अजून तिथे पहिला विजय मिळवायचा होता. मात्र, यावेळची टीम पाहून सर्वांना वाटलेलं आपण एक टेस्ट काय पूर्ण सीरिज जिंकून येऊ. ब्रिस्बेनमध्ये सीरिज सुरू झाली आणि टीम इंडियाला पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागला. अटीतटीची मॅच यजमान जिंकले. पर्थ टेस्टही तशीच रंगली, पण शेवटच्या दोन विकेट मिळाल्या नाहीत आणि ऑस्ट्रेलियाला 2-0 लीड मिळाली. दोन पराभव झाले असले तरी टीम इंडिया पॉझिटिव्ह होती की, आपण जिंकू शकतो. अखेर मेलबर्नमध्ये तो दिवस आला आणि टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवत, ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली टेस्ट जिंकून दाखवली. घाव ऑस्ट्रेलियाच्या वर्मावर लागलेला.
सिडनीच्या एससीजीवर चौथी टेस्ट सुरू झाली. टीम इंडिया कॉन्फिडन्सने ओतप्रोत होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन चवताळलेले. टीम इंडियाच्या बॉलर्सने याचाच फायदा घेतला आणि पहिल्या दिवशीच टी पर्यंत 131 वर ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. दीड-दोन दिवसानंतर बॉलिंगची सवय असलेल्या ऑस्ट्रेलियन बॉलर्सना ही गोष्ट आवडली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या त्या बॉलिंग अटॅकचे नेतृत्व करत होते जेफ थॉमसन. आता जेफ थॉमसन म्हणजे बॅटर्ससाठी गोरा राक्षसच. नाईन्टी माईलपेक्षा कमी स्पीडने कधी त्यांचे बॉल यायचे नाहीत. त्यात जगावेगळी बॉलिंग ऍक्शन त्यांना आणखी धोकादायक बनवायची. त्यामुळे सारे बॅटर्स त्यांना टरकून असायचे.
टीम इंडियासाठी पहिल्या इनिंगमध्ये ओपनिंगला उतरले चेतन चौहान आणि सुनील गावसकर. छोट्या उंचीचे हे दोन्ही ओपनर बडेबडे कारनामे करायचे. त्यादिवशी थोडाफार पाऊस झाल्याने पीच बॉलर्सना फायद्याची होती. थॉमसन यांनी आपल्या नेहमीच्या त्वेषानं बॉलिंग करायला सुरुवात केली. गावसकर-चौहान सांभाळून खेळत होते. अशात थॉमसन यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर एक बाऊंसर मारला जो चौहान यांनी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर कट काही बसला नाही, पण एज लागून बाऊंड्री नक्कीच गेली. त्यावर चेतन चौहान मोठ्याने हसले.
जे चेतन चौहान यांना जवळून ओळखायचे त्यांना माहीत होते की, ते अगदी बिनदिक्कत खळखळून हसतात. मात्र, त्यांचे हे हसणे थॉमसन यांना अजिबात आवडले नाही. ते चौहान यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, “यात हसण्यासारखे काय आहे?” त्यावर चौहान फक्त नथिंग म्हणाले. आधीच संतापलेल्या थॉमसन यांनी त्यानंतर एक अशी कृती केली, जी नेहमी चर्चित राहिली. त्यांनी चौहान यांच्या कपाळावर क्रॉस केला आणि म्हटले, “आता मी इथे बॉल मारणार मग हसून दाखव.”
त्यानंतर थॉमसन आणि इतर बॉलर्सनी चौहान यांच्यावर अक्षरशः बाऊंसरची बरसात केली. तरीही चौहान जागचे हलले नाहीत. ते साऱ्या बॉलर्सचा यशस्वी सामना करत राहिले. 124 बॉलमध्ये 42 रन्स करून ज्यावेळी ते ड्रेसिंग रूममध्ये परतले, तेव्हा त्यांचे बोट तुटल्याचे सर्वांना समजले. मात्र, त्या वेदनेतही थॉमसन यांना वरचढ त्यांनी होऊ दिले नव्हते.
या साऱ्यात मात्र प्रश्न पडतो की, त्यावेळी चौहान हसले का होते? याचे उत्तर देताना सुनील गावसकर म्हणालेले, “चेतन मनापासून हसायचा. त्याला आम्ही सारे मास्तर म्हणायचो. त्याच्याबद्दल एक गोष्ट अशी होती की, त्याला शॉर्ट पीच बॉल मिळाल्यावर तो स्क्वेअर कट खेळायचा. बॉल कनेक्ट झाला तरी फोर आणि एज लागला तरी फोर पक्का असायचा. ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली. त्यावरून त्याची खूप थट्टा व्हायची. ज्यावेळी थॉमसनला तो फोर मारला गेला, तेव्हा ड्रेसिंग रूममधून मास्तर मास्तर आणि हसण्याचे आवाज आम्ही ऐकले. त्यामुळेच आम्ही दोघेही हसलो आणि नेमके थॉमसन आणि चेतनची नजरानजर झाली.”
पुढे जाऊन टीम इंडियाने ती टेस्ट जिंकली आणि सीरिज 2-2 अशी बरोबरीत नेली. मात्र, शेवटची टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकत सीरिज नावावर केली. मात्र, सिडनी टेस्टमधील तो किस्सा कायमस्वरूपी अजरामर झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा