---Advertisement---

एका टीम इंडियाकडून दुसऱ्या टीम इंडियाला प्रोत्साहन; इंग्लंडमध्ये श्रीलंकेतील विजयाचा आनंद साजरा, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जुलै 21, 2021 2:22 AM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाने मंगळवारी (२० जुलै) यजमानांविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यातील विजयासह ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. विशेष म्हणजे भारताच्या या विजयाचा आनंद इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताच्या कसोटी संघानेही लुटला.

भारताचा रोमांचक विजय
या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ५३ धावांची खेळी केली. पण त्याच्या रुपात भारताने ६ वी विकेट गमावली. त्याच्यापाठोपाठ कृणाल पंड्याही ३५ धावा करुन बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ७ बाद १९३ अशी झाली होती. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून निसटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

नेमकी याचवेळी दीपक चाहरने ९ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या भुवनेश्वर कुमारला साथीला घेतले. या दोघांनी काही आक्रमक फटके खेळत धावगती हाताबाहेर जाऊ दिली नाही. बिकट परिस्थितीतही दोघांनी धैर्याने अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. अखेर ४९.१ षटकात या दोघांनी भारताला २७७ धावांवर पोहचवून विजय मिळवून दिला. या दोघांनी ८ व्या विकेटसाठी ८४ चेंडूत नाबाद ८४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला.

भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावा केल्या. तर दीपक चाहरने अर्धशतकी खेळी करताना ८२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या.

इंग्लंडमध्ये विजयचा आनंद साजरा
एकीकडे भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना दुसरीकडे भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी या संघाचा मंगळवारपासून काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना डरहॅम येथे सुरु झाला आहे.

दरम्यान हा सराव सामना सुरु असताना भारताच्या या कसोटी संघातील खेळाडूंनी भारताचा श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या वनडेतील विजयाचा आनंद साजरा केला. या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसले की सराव सामना सुरु असताना डरहॅमच्या मैदानातील ड्रेसिंग रुममध्ये भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी असे काही खेळाडू कोलंबोत झालेल्या श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना पाहाण्यात रंगून गेले आहे.

तसेच या व्हिडिओच्या अखेरीस दिसते की सराव सामन्याचा पहिला दिवस संपून परत जात असताना बसमध्ये भारताचा फिरतीपटू आर अश्विन आणि चेतेश्वर पुजारा दीपक चाहरने केलेल्या अर्धशतकाबद्दल कौतुक करत आहेत.

या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की ‘जेव्हा भारतीय संघ डरहॅममधून कोलंबोतील भारतीय संघाला प्रोत्साहन देतो. ड्रेसिंग रुम, डायनिंग रुम आणि अगदी बस मधूनही या अविस्मरणीय विजयाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला.’

तसेच या व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी बीसीसीआयने एक फोटोही शेअर केला होता, ज्यात डरहॅमच्या ड्रेसिंगरुममधून भारतीय खेळाडू कोलंबोत झालेला श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना पाहाताना दिसत होते.

सराव सामन्यात केएल राहुल, जडेजा चमकले
मंगळवारपासून काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सुरु झालेल्या सराव सामन्यात भारताकडून केएल राहुलने १०१ धावांची शतकी खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ७५ धावांची खेळी केली. या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारताने ९ बाद ३०६ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेविरुद्धचा दुसऱ्या वनडेतील विजय टीम इंडियासाठी ‘विश्वविक्रमी’; ऑस्ट्रेलियाला पछाडत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान

दीपक-भुवनेश्वरच्या जोडीचा मोठा पराक्रम! नाबाद ८४ धावांच्या भागीदारीसह ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवला दुसरा क्रमांक

अर्धशतक एक विक्रम अनेक! दीपक चाहरने नाबाद अर्धशतकी खेळीसह चार मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---