भारतीय संघाने 2022 क्रिकेट सिझनला सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 सीरिज बरोबरच सुटली. त्यानंतर संघ मागील वर्षी इंग्लंडमध्ये राहिलेली एक टेस्ट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाली. त्याचवेळी आणखी एक भारताने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयर्लंडविरुद्ध 2 टी20 खेळली. अगदी अशीच वेळ 2021 मध्ये आलेली. त्यावेळी कोव्हिडच्या कारणाने दोन टीम इंडिया खेळल्या. प्रमुख भारतीय संघ विराट कोहली याच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची तयारी करत होती तर, इकडे शिखर धवन याच्या नेतृत्वात युवा भारत श्रीलंकेशी दोन हात करत होता. मात्र, भारतीय क्रिकेटर इतिहासात दोन संघ खेळण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी 23 वर्षांपूर्वी अशाच दोन टीम इंडिया वेगवेगळ्या खंडात खेळलेल्या. कधी घडली होती ही घटना त्याबाबत हा लेख.
भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट इतिहासातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी. या दोन्ही टीम्सच्या मॅचेस रोमांचक व्हायच्या. लोकांमध्ये या मॅचेसची क्रेझही होती. मात्र, सीमेवरील तणावामूळे दोन्ही संघांना सातत्याने एकमेकांविरुद्ध खेळता येत नव्हते. अशात 1996 मध्ये सहारा फ्रेंडशिप कप सुरू करण्यात आला. सलग पाच वर्ष भारत आणि पाकिस्तानची वनडे सीरिज कॅनडातील टोरंटो इथे घेण्याचे नियोजन झालेले. पहिल्या वर्षी पाकिस्तान तर दुसऱ्या वर्षी टीम इंडिया सीरिज जिंकली. 1998 च्या सप्टेंबरमध्ये तिसरा सहारा फ्रेंडशिप कप खेळण्याचे ठरले.
नेमके याच कालावधीत मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार होत्या. आशियातील कोणत्याही शहरात प्रथमच कॉमनवेल्थ होत होती. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश केला गेलेला. टीम इंडियाने त्यासाठी क्वालिफाय केलेलं. मात्र, संघासमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिला. पाकिस्तान विरुद्धची सीरिज अधिक प्रभावी होणार होती. तिला जास्त डिमांड होती. इकडे कॉमनवेल्थ गेम्स खेळण्याची संधीही हुकवायची नव्हती. सहारा कप 12 ते 20 सप्टेंबर या काळात तर, कॉमनवेल्थ 9 ते 19 सप्टेंबर या कालावधीत होणार होता. यातून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयने शक्कल लढवली. त्यांनी दोन्ही ठिकाणी टीम पाठवण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही टीम संतुलित केल्या आणि दोन्ही स्पर्धांमध्ये पाठवून दिल्या. सहारा कपसाठी टोरंटोला नियमित कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वात टीम पाठवली गेली. यामध्ये सौरव गांगुली, राहुल द्रविड, सिद्धू, जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद या प्रमुख खेळाडूंचा समावेश होता. दुसरीकडे, नियमित उपकर्णधार अजय जडेजाला कॅप्टन बनवत कॉमनवेल्थसाठी टीम इंडिया रवाना झाली. जडेजाच्या जोडीला सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, रॉबिन सिंग, पारस म्हांब्रे होते. कॉमनवेल्थचा फॉरमॅट अगदी सोपा होता. 16 संघ 4 ग्रूपमध्ये एका ग्रूपमधील चार टीम्स एकमेकाविरुद्ध एक वेळा खेळणार. टीम इंडिया बी ग्रूपमध्ये होती. या ग्रुपमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, ऍटिग्वा-बार्बुडा आणि तिकडे सहारा कपचे यजमान असलेला कॅनडा हे संघ होते. ग्रूपमध्ये अव्वल राहणार संघ थेट सेमी फायनल खेळणार होता.
दोन्ही स्पर्धांना सुरुवात झाली. कॉमनवेल्थमध्ये टीम इंडियाने पहिली मॅच खेळली कॅनडाविरुद्ध. अमेय खुरासियाच्या 84 रन्सने टीम इंडिया 157 पर्यंत अनिल कुंबळेने अवघ्या 11 रन्स देत 4 विकेट घेऊन कॅनडाचा डाव 45 रन्सवर गुंडाळला. तिकडे टोरंटोमध्ये सौरव गांगुलीच्या ऑलराऊंड खेळाच्या जोरावर टीम इंडियाने विजयी सुरुवात केली. मात्र, इतकाच आनंद टीम इंडियाच्या नशिबात होता. क्वालालंपूरमध्ये ऍटिग्वा-बार्बुडाविरूद्धची मॅच पावसाने रद्द झाली. तिकडे पाकिस्तानने पुढील दोन्ही मॅच जिंकून आघाडी घेतली. कॉमनवेल्थच्या शेवटच्या लीगमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाला हरवणे गरजेचे होते. परंतु, टीम इंडियाने कच खाल्ली. 146 रन्सची मोठी हार इंडियाने पाहिली. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचे आणि त्यानंतर मेडल मिळवण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंग पावले. इकडे चौथा वनडेही जिंकत पाकिस्तानने सहारा कप आपल्या नावे केला.
सहारा कपच्या शेवटच्या मॅचसाठी कॉमनवेल्थ गेम्सच्या तिन्ही मॅचमध्ये मिळून फक्त 23 रन्स करणारा सचिन तेंडुलकर व कॅप्टन अजय जडेजा टोरंटोला पोहोचले. इभ्रत राखण्याच्या इराद्याने शेवटच्या मॅचमध्ये उतरलेल्या टीम इंडियाने अझरचे शतक व सचिनच्या 77 रन्सच्या जोरावर 256 रन्स उभारले. प्रत्युत्तरात, सईद अन्वर आणि आमीर सोहेल यांनी तुफान धुलाई केली. अन्वर 83 रन्स करून आऊट झाला. मात्र, आमीरने नॉट आउट 97 रन्स चोपत पाकिस्तानला सिरीज 4-1 ने जिंकून दिली.
इतके प्रयत्न करूनही टीम इंडियाला दोन्ही ठिकाणी अपयश आले. दुर्दैवाने, कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटची ती पहिली आणि शेवटची एन्ट्री ठरली. दक्षिण आफ्रिकेने ते गोल्ड मेडल आपल्या नावे केले. तसेच, जो सहारा कप पाच वर्षे खेळवण्यात येणार होता तो त्यावर्षीच अखेरच्या वेळी खेळला गेला. कारण, 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर दोन्ही देशातील क्रिकेट जवळपास बंद झाले. परंतु, बीसीसीआयचा एकाच वेळी दोन संघ खेळवण्याचा प्रयोग पुरता फसला हे सिद्ध झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून
‘त्या’ वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत