भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रमवारी (७ मे) इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. भारतीय संघ जून ते सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामना खेळणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
या दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्झन नाग्वास्वाल्ला या खेळाडूंचा समावेश आहे. या ४ खेळाडूंमध्ये २३ वर्षीय अर्झन नाग्वास्वाल्लाच्या निवडीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या डावखुरा मध्यमगती गोलंदाजाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ.
अर्झनचा जन्म सुरत, गुजरात येथे झाला. त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटदेखील गुजरातकडून खेळतो. तो लहानपणी त्याच्या भावाकडून क्रिकेट खेळायला शिकला. त्याने गुजरातच्या वरिष्ठ संघात २०१८ साली अ दर्जाच्या सामन्यातून पदार्पण केले. त्याने राजस्थानविरुद्ध हा पदार्पणाचा सामना खेळताना ८ षटकात ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याचवर्षी त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण झाले. पण त्याला बडोदा विरुद्धच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात खास काही करता आले नाही. त्याने केवळ १ विकेट घेतली.
पण, अर्झन २०१८-१९ हंगामादरम्यान मुंबईविरुद्धच्या सामन्यात केलेल्या त्याच्या अफलातून कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला होता. त्याने सुर्यकुमार यादव, अर्मान जाफर, आदित्य तरे, ध्रुमिळ मटकर आणि सिद्धेष लाड यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. अर्झनने २०१९ साली टी२० क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतून पदार्पण केले होते. त्याने तमिळनाडू विरुद्धच्या पदार्पणाच्या टी२० सामन्यात ४ षटकात ११ धावा देत ३ विकेट्स घेण्याची शानदार कामगिकी केली होती.
तसेच अर्झनसाठी २०१९-२० हंगाम खुपच चांगला ठरला. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये या हंगामात ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या होत्या. या दरम्यान त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
याबरोबकच यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने सय्यद मुश्ताक अली २०२१ स्पर्धेत ९ विकेट्स आणि विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत १९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉपीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध १९ धावांच ६ विकेट्स घेतल्या होत्या.
अशी आहे अर्झनची एकूण कारकिर्द –
अर्झनने आत्तापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने २२.५३ सरासरीने ६२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २० अ दर्जाने सामने खेळले असून २१.७६ च्या सरासरीने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तर १५ टी२० क्रिकेट सामन्यांत १६.३८ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा! मास्क खरेदी करु न शकणाऱ्या गरजूंच्या मदतीसाठी आर अश्विन आला पुढे; दिले हे आश्वासन