इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या ४३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा बुधवारी (२९ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्सशी सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेंगलोरने सात गडी राखून विजय मिळवला. बेंगलोरने या सामन्यात अष्टपैलू जॉर्ज गार्टनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. गार्टनने या सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केले.
आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने पहिल्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. मात्र, त्यानंतर त्याचे दुसरे षटक अत्यंत महागडे ठरले. त्याने आपल्या दुसऱ्या षटकात १८ धावा खर्च केल्या. हा इंग्लिश अष्टपैलू खेळाडू कोण आहे आणि त्याची मागील कारकीर्द कशी होती याबाबत जाणून घेऊ या.
अशी राहिली आहे कारकीर्द
चोवीस वर्षीय गार्टन ‘इंग्लंड लायन्स’ आणि इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. गार्टनने आतापर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २४ सामन्यांत ४.०४ च्या सरासरीने ५३ बळी घेतले आहेत. फलंदाजीमध्येही त्याने आतापर्यंत सर्वांना प्रभावित केले आहे. गार्टनने २४ सामन्यांमध्ये ५५.८९ च्या स्ट्राईक रेटने ५६९ धावा केल्या असून, यामध्ये त्याने चार अर्धशतके केली आहेत. गार्टनने लिस्ट ए मधील २४ सामन्यांमध्ये २९ बळी तर, १०३ धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्येही दमदार गोलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये ३९ सामन्यांत ४६ बळी घेतले आहेत. फलंदाजीमध्ये त्याने ३९ सामन्यांमध्ये २२८ धावा केल्या आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेत त्याला इंग्लंड संघात संधी देण्यात आलेली. मात्र, तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकला नाही.
आयपीएल कारकीर्दीची शानदार सुरुवात
आयपीएल उत्तरार्धातील पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या कायले जेमिसनच्या जागी गार्टनला आरसीबी संघ व्यवस्थापनाने पदार्पणाची संधी दिली. त्याने आपल्या पहिल्या सामन्यात केवळ ३ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत एविन लुईसचा महत्वपूर्ण बळी मिळवला.