आयपीएल 2024 च्या 21व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं गुजरात टायटन्सवर 33 धावांनी शानदार विजय मिळवला. रविवारी (7 एप्रिल) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमानांनी 164 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात, गुजरातची टीम 130 धावांवर ऑलआऊट झाली.
लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयाचा शिल्पकार होता वेगवान गोलंदाज यश ठाकूर, ज्यानं धारदार गोलंदाजी करत 30 धावांंत 5 बळी घेतले. आयपीएलच्या या हंगामात प्रथमच एखाद्या गोलंदाजानं एका सामन्यात 5 बळी घेतले आहेत. यश ठाकूरनं आपल्या पहिल्या षटकात गुजरातचा कर्णधार शुबमन गिलला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आल्यावर त्यानं डबल विकेट मेडन ओव्हर टाकला. त्याला तिसऱ्या षटकात एकही विकेट मिळाली नाही. मात्र आपल्या अखेरच्या षटकात त्यानं 2 गड्यांना बाद करत एकूण 5 बळी घेतले.
यश ठाकूरनं शुबमन गिलशिवाय विजय शंकर, राशिद खान, राहुल तेवतिया आणि नूर अहमद यांची विकेट घेतली. यशची ही कामगिरी खूप महत्त्वाची ठरते, कारण या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे त्याच्यावर विकेट घेण्याची मोठी जबाबदारी होती. यशनं ही जबाबदारी उत्तमपणे निभावत संघाला विजय मिळवून दिला.
यश ठाकूरचा जन्म 28 डिसेंबर 1998 रोजी कोलकाता येथे झाला होता. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यश ठाकूरला आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला यष्टीरक्षक बनायचं होतं. महेंद्रसिंह धोनी हा त्याचा रोल मॉडेल होता. मात्र एके दिवशी विदर्भाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांनी यशला नेट्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्यांनी त्याला वेगवान गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला.
25 वर्षाच्या यश ठाकूरनं विदर्भासाठी आतापर्यंत 22 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावे 67 बळी आहेत. याशिवाय त्यानं 37 लिस्ट ए सामन्यांमध्ये 54 बळी घेतले आहेत. यशकडे 49 टी20 सामने खेळण्याचाही अनुभव आहे, ज्यामध्ये त्यानं 74 विकेट्स घेतल्या आहेत. यश ठाकूर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला आपला आदर्श मानतो. उमेश देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचं प्रतिनिधीत्व करतो.
आयपीएल 2023 च्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सनं यश ठाकूरला 45 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. यशनं त्या हंगामात लखनऊसाठी 9 सामने खेळले. या दरम्यान त्यानं 9.08 च्या इकॉनॉमी रेटनं 13 बळी घेतले. आयपीएल 2024 मध्ये त्यानं आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलं आहे. चालू हंगामात त्यानं 3 सामन्यात 6 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एड शीरननं विचारलं, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”; शुबमन गिलनं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल!
शुबमन गिलची बॅटिंग पाहण्यासाठी हे छोटे चाहते चक्क 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून आले!