भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये येत्या २६ डिसेंबर पासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडूंना रविवारी (१२ डिसेंबर) बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी एकत्र यायचे होते. त्यापूर्वी सर्व खेळाडू मुंबईच्या कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सराव करण्यात व्यस्त होते. बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी जोरदार सराव केल्याचे पाहायला मिळाले होते. अजिंक्य रहाणेने ४५ मिनिटं सराव केल्यानंतर रोहित शर्मा सराव करण्यासाठी आला होता. त्यावेळी सॉफ्ट क्वारंटाईन सुरू असल्याने गोलंदाज उपलब्ध नव्हते. त्यामुळे ३ थ्रो डाऊन स्पेशालिस्टने त्याचा सराव करून घेतला.
यावेळी भारतातील सर्वात ज्येष्ठ थ्रो डाऊन स्पेशलिस्ट राघवेंद्र उर्फ रघू देखील उपस्थित होते. त्यांच्यामुळेच रोहित शर्माचे सत्र लवकरच संपले. राघवेंद्र यांचा थ्रो रोहित शर्माच्या हाताला लागला होता. ज्यामुळे त्याला वेदना होऊ लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली.
ही पहिली वेळ नाही, जेव्हा राघवेंद्रमुळे कुठल्या खेळाडूला दुखापत झाली आहे. यापूर्वी २०१६ साली, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीत खेळणार होता, तेव्हा सरावादरम्यान राघवेंद्रचा थ्रो अजिंक्य रहाणेच्या हाताला लागला होता. त्यावेळी त्याची बोटे तुटली, ज्यामुळे त्याला सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’
ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ जाहीर, ‘हे’ खेळाडू दुसऱ्यांदा खेळणार स्पर्धा
“आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”, रोहितने विराटच्या नेतृत्वाचे गायले गुणगान