प्रो कबड्डीमध्ये पुणे लेगच्या शेवटच्या दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना झोन बी मधील संघात असेल. या सामन्यात बेंगाल वॉरियर्स आणि तेलुगू टायटन्स आपापसात भिडणार आहेत.
या सामन्याचा निकालाचा या झोनमध्ये काही मोठा प्रभाव पडणार नाही. सर्व संघ आहे त्या स्थानावरच राहतील.
दुसऱ्या सामन्यात झोन ए मधील संघ पुणेरी पलटण आणि गुजरात फॉरचूनजायन्टस एकमेकांविरुद्ध लढतील. हा सामना या साखळी सामन्यातील शेवटचा सामना असून हा सामना जिंकणारा संघ झोन ए मध्ये पहिल्या स्थानावर पोहचेल. त्यामुळे या सामन्याला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे.
पुणे लेग पुणेरी संघासाठी मिश्र स्वरूपाचा राहिला आहे. या लेगमध्ये झालेल्या ५ सामन्यांपैकी ३ सामन्यात पुणेरी संघाने विजय मिळवला आहे तर उर्वरित २ सामन्यात या संघाला पराभव सहन करावा लागला आहे.
या संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू ऑलराऊंडर संदीप नरवाल या सामन्यात परतण्याची शक्यता आहे. मागील चार सामन्यात तो मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे संघाबाहेर होता.
पुणे लेगच्या पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणला गुजरातकडून मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. ते विसरून आजच्या सामन्यात त्याना चांगली कामगिरी करावी लागेल. पुणेरी संघाच्या नावावर २१ सामन्यात ७९ गुण आहेत तर २१ सामन्यानंतर गुजरात संघाच्या नावावर ८२ गुण जमा आहेत.
पुणे आणि गुजरातमध्ये ३ गुणांचा फरक आहे. पुणेरी संघाने हा सामना जिंकला तर ते पहिल्या स्थानावर पोहचतील. हा सामना बरोबरीत जरी सुटला तरी गुजरात पहिल्या स्थानावर विराजमान राहील.
गुजरात संघ या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या संघाचे दोन्ही कॉर्नर्स उत्तम तर आहेतच परंतु या संघाचे कव्हर्स आणि रेडर्स देखील जबरदस्त लयीत आहे.
या संघातील रेडर सचिन या स्पर्धेतील शोध म्हणून पुढे आला आहे तर मागील सामन्यात सुकेश हेगडेने उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याच्या टीकाकारांचे तोंड गप्प केले होते.
आजचा सामना पुणेरी पलटण संघाला जिंकायचा असेल तर या संघाची मजबुती म्हणजे डिफेन्सने उत्तम खेळ करावा लागेल, जेणेकरून गुजरातचे रेडर्स बाद होत जातील आणि डिफेंडर देखील शिकार होत जातील. या सामन्यात दीपक निवास हुड्डा याला उत्तम कामगिरी करून आपण मोठ्या सामन्यासाठीचे खेळाडू आहोत हे सिद्ध करावे लागेल.
राजेश मंडल, संदीप नरवाल,गिरीष एर्नेक यांच्याकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
पहिल्या स्थानाचे महत्व का?
जे संघ आपल्या आपल्या झोनमध्ये पहिल्या स्थानावर असणार आहेत ते प्ले ऑफमध्ये एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील आणि या सामन्यातून विजेता ठरेल तो थेट अंतिम सामना गाठेल. जो संघ सामना हरेल त्याला अंतिम सामना गाठण्यासाठीही संधी असणार आहे तो थेट बाहेर फेकला जाणार नाही.