भारतीय संघ सध्या वेस्ठ इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) खेळला गेला, जो भारताने २ विकेट्सने जिंकला. भारतीय संघाने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले असले तरी, संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला मात्र खेळण्याची संधी मिळाली नाही.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचा नेतृत्व करत आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी धवन आणि शुबमन गिल ही जोडी येत आहे. दुसरीकडे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला मात्र प्लइंग इलेव्हनमधून वगळले गेले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी धवन आणि ऋतुराज हे दोघे डावाची सुरुवात करतील, अशी अपेक्षा होती. पंरतु तसे काही होताना दिसले नाही. यापूर्वी भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्यात ऋतुराज गायकवाडला संघात संधी दिली गेली होती. परंतु त्याठिकाणी तो पूर्णपणे अपयशी ठरला होता.
सलामीसाठी ऋतुराजला संधी मिळाली नसली, तरी तो मध्यक्रमात देखील चांगले प्रदर्शन करू शकतो. मध्यक्रमातील महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव या मालिकेत खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. अशात तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या जागी ऋतुराजला संधी मिळण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.