रविवारी (8 मार्च) महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. या पराभवामुळे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर निराश असल्याचे दिसून आले. मात्र, तिने भारतीय संघावरती विश्वास दाखवला आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रदर्शनावर गर्व असल्याचे म्हटले आहे.
अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात लॅनिंगने सांगितले, “मला माझ्या संघावर आणि सपोर्ट स्टाफचा अभिमान आहे. आम्हाला या विश्वचषकात अनेक चढ-उतार आले. पण, जो दिवस सर्वात महत्त्वाचा होता, त्या दिवशी मात्र आम्ही विरुद्ध संघाला वरचढ होण्याची संधी दिली नाही.”
भारताची प्रशंसा करताना लॅनिंग पुढे म्हणाली, “भारतीय संघ खूप मजबूत आहे. त्यांनी आम्हाला या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पराभूत करत हे सिद्ध करून दाखवले. पण, आम्ही हे चषक जिंकण्यासाठी आलो होतो. त्यानुसार आम्ही तयारीही केली होती. प्रत्येकाला आम्ही जिंकणार अशी अपेक्षा होती. म्हणून अंतिम सामन्यात आम्ही आमच्या रणनितीत बदल केले. मेगन शटनेही चांगली गोलंदाजी केली. मला माहीत होते की, ती किती सक्षम आहे आणि योग्य वेळी काय करू शकते.”
तसेच सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत म्हणाली, “आम्ही साखळी सामन्यात खूप चांगले खेळलो पण, अंतिम सामन्यात बरेच झेल सुटले. यामुळे आमचा पराभव झाला. पण असे असले तरी माझा माझ्या संघावर संपूर्ण विश्वास आहे. पुढे येणारी दीड वर्षे आमच्यासाठी खूप महत्त्वाची असतील. आम्हाला शांत राहून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल.”
“मला मान्य आहे की संघाने चांगले क्षेत्ररक्षण केले नाही. यामुळेच आम्हाला बरेचसे सामने गमवावे लागले आहेत. पहिल्या सामन्यात विजय मिळाल्यामुळे आमचा आत्मविश्वास आणि उत्साहही वाढला. साखळी फेरीत आम्ही सगळे सामने जिंकले. मात्र, दुर्देवाने अंतिम सामना आम्हाला जिंकता आला नाही. तरी आम्ही हार मानणार नाही. आम्हाला अजून सुधारणा करण्याची गरज आहे. मला खात्री आहे की, आम्ही भविष्यात अजून चांगले प्रदर्शन करू. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून चांगल्या खेळाडूंनाही शोधायचे आहे,” असेही हरमनप्रीत पुढे म्हणाली.