गुरुवारी (दि. 27 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने 5 विकेट्सने जिंकला. या सामन्यात सूर्यकुमार यादव खास प्रदर्शन करू शकला नाही. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 25 चेंडूत फक्त 19 धावांचे योगदान दिले. यानंतर खराब फॉर्ममुळे सूर्याविषयी नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अशात आता भारतीय संघाचा माजी फलंदाज आरपी सिंग याने सूर्याविषयी मोठे भाष्य केले आहे.
आरपी सिंग (RP Singh) याने आगामी आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संभावित पर्याय म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला पाठिंबा दिला आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर याच्या स्पर्धेतील सहभागावर संशय व्यक्त केला जात आहे. अशात आरपी सिंगला वाटते की, सूर्याला मोठ्या स्पर्धेपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे.
‘सूर्यकुमार यादवला मिळाली पाहिजे संधी’
जिओ सिनेमावरील चर्चेदरम्यान आरपी सिंग म्हणाला की, “श्रेयस अय्यरसोबत सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकासाठी चांगला पर्याय आहे. तसेच, तो फिटही आहे. मात्र, जर तुम्ही त्याला बॅकअप पर्यायाच्या रूपात पाहत असाल, तर त्याला खेळण्यासाठी पूर्ण वेळ देणेही महत्त्वाचे आहे आणि निश्चितच तो एक चांगली निवड असेल.”
वनडे क्रिकेटमध्ये कसा यशस्वी होऊ शकतो सूर्यकुमार यादव?
माजी क्रिकेटपटूने सूर्याने फॉर्ममध्ये सुधारणा कशी करू शकतो याविषयीदेखील सांगितले. तो असेही म्हणाला की, संघाकडे चौथ्या क्रमांकासाठी खूपच कमी पर्याय आहेत. तो म्हणाला, “मोठ्या स्पर्धांमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे नेहमी बॅकअप पर्याय असले पाहिजेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याचा चालू फॉर्म चांगला राहिला आहे. वनडे क्रिकेट प्रकार वेगळा आहे. कारण, तुम्हाला जास्त संख्येत चेंडूंचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याला आपल्या खेळात जरा बदल करावा लागेल.”
विश्वचषक 2019दरम्यान भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाने खूपच त्रास दिला होता. अशात आता श्रेयस अय्यर आपल्या रिकव्हरीमुळे उपलब्ध राहू शकला नाही, तर चौथ्या क्रमांकाचा मुद्दा पुन्हा उपस्थित होऊ शकतो. सूर्यकुमार टी20त मिळवलेले यश वनडेत मिळवू शकला नाही. मात्र, तरीही आरपीने त्याला एक पर्याय म्हणून निवडण्याचे समर्थन केले आहे.
सूर्याने भारताकडून 1 कसोटी, 24 वनडे आणि 48 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान कसोटीत त्याने 8 धावा, वनडेत 23.79च्या सरासरीने 452 धावा आणि टी20त 46.53च्या सरासरीने 1675 धावा केल्या आहेत. (world cup 2023 rp singh on suryakumar yadav said good choice for team india number this position know here)
महत्त्वाच्या बातम्या-
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
SRHची मालकीण काव्या मारनला दु:खात पाहू शकत नाहीत रजनीकांत; म्हणाले, ‘हैदराबादने आता…’