रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही निवृत्त क्रिकेटपटूंची टी२० स्पर्धा खेळली जात आहे. साखळी सामन्यांच्या समाप्तीनंतर आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, यजमान इंडिया लिजेंड्स पहिल्या उपांत्य सामन्यात खेळताना दिसेल. स्पर्धेचा अंतिम सामना २१ मार्च रोजी खेळवला जाईल.
असे होतील उपांत्य सामने
वेस्ट इंडीज लिजेंड्सने अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंड लिजेंड्सवर मात केल्यानंतर, उपांत्य सामन्यात कोण कोणाविरुद्ध भिडणार याचे चित्र स्पष्ट झाले. अंकतालिकेत अव्वलस्थानी राहिलेला इंडिया लिजेंड्सचा संघ तिसऱ्या स्थानी राहिलेल्या वेस्ट इंडिज लिजेंड्सविरुद्ध आज (१७ मार्च) खेळेल. तसेच, दुसरा उपांत्य सामना श्रीलंका लिजेंड्स व दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यात १९ मार्च रोजी खेळला जाईल. इंग्लंड लिजेंड्स व बांगलादेश लिजेंड्स उपांत्य फेरीत जागा मिळवण्यात अपयशी ठरले.
यशस्वी संघ ठरला इंडिया लिजेंड्स
या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वातील इंडिया लिजेंड्स ठरला. संघाने साखळी सामन्यातील पाच पैकी चार सामन्यात विजय संपादन केला. इंडिया लिजेंड्सला इंग्लंड लिजेंड्सकडून अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंडिया लिजेंड्स संघात सचिन तेंडुलकरव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, पठाण बंधू, मोहम्मद कैफ, नमन ओझा या फलंदाजांसह मुनाफ पटेल, विनय कुमार, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा व डेव्हिड नोएल यांचा समावेश आहे.
सामाजिक हेतूने सुरू केली आहे स्पर्धा
नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झाली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर स्पर्धा स्थगित केली गेलेली. त्यावेळी, मुंबई व पुणे येथे नियोजित स्पर्धा यावेळी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे खेळली जात आहे. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गचाळ क्षेत्ररक्षणानंतर शार्दुलवर विराटचा चढला पारा, व्हिडिओ होतोय व्हायरल
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या गाडीला मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
‘या’ कारणामुळे कोहलीने आपला क्रमांक ईशान किशनला दिला, फलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण