येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना साऊथम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे. या मोठया सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. तसेच आयसीसीने कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. तब्बल २ वर्ष सुरु राहिलेल्या या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी जगातील सर्वोत्कृष्ट संघांना पराभूत करत, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. चला तर पाहूया कसा होता भारतीय संघाचा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रवास?
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ प्रथम स्थानी आहे. ऑगस्ट २०१९ पासून भारतीय संघाने सहा द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाला पाच मालिकेत विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एका मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सहा द्विपक्षीय मालिकांमध्ये भारतीय संघाने एकूण १७ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये भारतीय संघाला १२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सोबतच १ सामना अनिर्णित राहिला होता. अशाप्रकारे ५२० (७२.२%) गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी विराजमान आहे
या संघांना पराभूत करत भारतीय संघाने गाठली अंतिम फेरी
-भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात वेस्टइंडीज संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून केली होती. २०१९ मध्ये या मालिकेत भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता.
-भारतीय संघाने दुसरी मालिका दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळली होती. भारतात खेळविण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने तिन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत केले होते.
-तिसऱ्या द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघासमोर बांगलादेश संघाचे आव्हान होते. २ सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मयंक अगरवालने २४३ धावांची तुफानी खेळी केली होती. तर दुसर्या सामन्यात ईशांत शर्माने ९ गडी आणि उमेश यादवने ८ गडी बाद केले होते.
-भारतीय संघाने सलग तीन कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवल्यानंतर, चौथ्या मालिकेत न्युझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. या मालिकेत भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने २-० ने धूळ चारली होती. या मालिकेत टीम साऊथी आणि काईल जेमिसन या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले होते.
-विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वात कठीण आव्हान म्हणजे ऑस्ट्रेलिया दौरा. या दौऱ्यावर भारतीय संघाने २-१ ने ऐतिहासिक विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने पुढील सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले होते.
-याचवर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेत विजय मिळवणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे होते. अन्यथा भारतीय संघ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचू शकला नसता. या मालिकेत आर अश्विन आणि अक्षर पटेल या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीने इंग्लंड संघातील फलंदाजांना अडकवून ठेवले होते. (Indian team performance in World test championship 2021)
महत्त्वाच्या बातम्या-
विनू मंकड यांचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, मास्टर ब्लास्टरने दिल्या शुभेच्छा
भुर्रर्रर्र! विकेट मिळाल्यावर गोलंदाजाचे हटके सेलिब्रेशन, चालवली मोटारसायकल
अवघ्या ८ चेंडूत युएईत आणलं वादळ, पीएसएलच्या एका सामन्यात सुपरस्टार बनला ‘हा’ पठ्ठ्या