येते काही महिने भारतीय क्रिकेट संघ केवळ कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत भारतीय संघ एक-दोन नव्हे, चक्क 10 कसोटी सामने खेळणार आहे! 111 दिवसांत भारतीय संघाला 10 कसोटी सामने खेळायचे आहे. यापैकी पाच कसोटी सामने भारतात, तर पाच कसोटी सामने विदेशात खेळले जाणार आहेत. या बातमीद्वारे जाणून घ्या, भारतीय संघ कधी आणि कोणाविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे.
भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
सर्वप्रथम, भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळला जाईल. यानंतर ऑक्टोबरमध्ये आणखी एक कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ 16 ऑक्टोबरपासून बंगळुरूमध्ये भिडणार आहेत. दुसरा सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. तर 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना व्हायचे आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये, तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये, चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाईल. अशाप्रकारे, 19 सप्टेंबर ते 7 जानेवारी या 111 दिवसांच्या कालावधीत भारतीय संघ 10 कसोटी सामने खेळणार आहे.
हेही वाचा –
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं