भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना खेळताच भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये १० वेळेस अंतिम सामने खेळणाऱ्या संघाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन संघाशी बरोबरी साधणार आहे. तर न्यूझीलंड संघाचा हा पाचवा अंतिम सामना असणार आहे.
तसेच वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघांनी ८-८ वेळेस आयसीसी स्पर्धेचे अंतिम सामने खेळले आहेत. या यादीत दोन्हीही संघ संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघ या यादीत तळाशी आहे. आतापर्यंत आयसीसीचे एकूण ५३ अंतिम सामने खेळले गेले आहेत.
विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकून वेस्ट इंडिजची बरोबरी करण्याची संधी
भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर, कुठल्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा भारतीय संघाचा ५ वा विजय असेल. या बाबतीत भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाची बरोबरी करेल. सर्वाधिक अंतिम सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण १० अंतिम सामने खेळले आहेत. यात त्यांना ७ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकून इतिहास रचण्याची संधी
कसोटी क्रिकेटकडे, चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ जेतेपद मिळवण्यासाठी आमने सामने असणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले तर भारतीय संघ २ आयसीसी स्पर्धेचा पहिला हंगाम जिंकणारा क्रिकेटविश्वातील पहिला संघ ठरेल. यापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिलेवहिले टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केले होते.
दोन वेळेस कोरले आहे वनडे विश्वचषकावर नाव
भारतीय संघाने आतापर्यंत ३ वेळेस वनडे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. ज्यामध्ये दोन वेळेस (१९८३, २०११) भारतीय संघाला जेतेपद पटकावण्यास यश आले आहे. तर २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच भारतीय संघाने दोन वेळेस टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय संपादन करण्यास यश आले होते. तर २०१४ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा
इंग्लंडवर १-०ने मात करत न्यूझीलंडचा ‘मोठा’ पराक्रम, २२ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला पूर्णविराम