आज (05 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अँटिग्वा येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात कर्णधार यश धूलसह उपकर्णधार शेख राशिद आणि इतर खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असेल. हा सामना जिंकत भारताचा पाचव्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याची संधी असेल. या महत्त्वपूर्ण सामन्यानंतर जो खेळाडू मालिकावीर म्हणून घोषित केला जाईल, लवकरच त्याच्या नशीबाचे तारे चमकण्याची शक्यता आहे. ते कसं, पाहूया…
19 वर्षांखालील विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत आजवर जे-जे खेळाडू मालिकावीर बनले आहेत, त्यातील जवळपास सर्व खेळाडूंना भारतीय संघांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.
मागील 2020 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाची सांघिक कामगिरी उत्तम झाली होती. या विश्वचषकात भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल चांगलाच चमकला होता. त्याने बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यातही 121 चेंडूत 88 धावांची खेळी केली होती.
त्याने या संपूर्ण विश्वचषकात 6 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 133.33 च्या सरासरीने 400 धावा केल्या होत्या. तसेच त्याने गोलंदाजी करताना 3 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा (मालिकावीर) पुरस्कारही देण्यात आला होता.
https://twitter.com/BCCI/status/1226555882214805504
त्यामुळे यशस्वी 19 वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. याआधी युवराज सिंग(2000), शिखर धवन (2004), चेतेश्वर पुजारा(2006) आणि शुबमन गिल(2018) या भारतीय क्रिकेटपटूंना 19 वर्षांखालील विश्वचषकाचा मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
विशेष म्हणजे या चारही क्रिकेटपटूंनी 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर पुढे जाऊन वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. अद्याप २० वर्षीय जयस्वालला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र तो लवकरच भारताच्या वरिष्ठ संघातून खेळताना दिसू शकतो.
त्यामुळे यंदाच्या विश्वचषक हंगामात कोणता खेळाडू मालिकावीर ठरतो आणि जर भारताताच्याच खेळाडूला तो मान मिळाला तर त्या खेळाडूचा देखील भारताच्या वरिष्ठ संघात समावेश होणार का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.
-19 वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळालेले भारतीय क्रिकेटपटू –
2000 – युवराज सिंग (203 धावा आणि 12 विकेट्स)
2004 – शिखर धवन (505 धावा)
2006 – चेतेश्वर पुजारा (349 धावा)
2018 – शुबमन गिल (372 धावा)
2020 – यशस्वी जयस्वाल (400 धावा आणि 3 विकेट्स)
महत्त्वाच्या बातम्या-
असा आहे टीम इंडिया आणि १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा इतिहास