भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजयात सर्वात महत्वाचा वाटा उचलला तो पंजाबच्या शुभमन गिलने. त्याने या संपूर्ण स्पर्धेत खेळताना आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे त्याच्या खेळींची सर्वांनीच दखल घेतली.
या स्पर्धेसाठी त्याला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मार्गदर्शन केल्याचे त्याने सांगितले आहे. शुभमन म्हणाला, ” जेव्हा युवराज बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत ट्रैनिंग घेत होता तेव्हा त्याने मला खूप मार्गदर्शन केले. त्याने मला मैदानावरील आणि मदानाबाहेरच्या गोष्टींविषयी सांगितले. तसेच त्याने मला काही टिप्स दिल्या आणि माझ्यासोबत फलंदाजीही केली.”
शुभमनने या विश्वचषकात उत्तम फलंदाजी करताना तीन अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. त्याचे हे नाबाद शतक पाकिस्तान विरुद्ध पार पडलेल्या उपांत्य सामन्यात आले होते. तसेच त्याने या विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावण्याचीही कामगिरी केली आहे. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला.
त्याच्या या कामगिरीची तुलनाही युवराज बरोबर करण्यात येते कारण युवराजनेही २००० साली पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळताना मालिकावीराचा किताब पटकावला होता. तसेच तेव्हा भारताने पहिल्यांदाच १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाने युवराज, मोहम्मद कैफ अशा खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. तसेच या विश्वचषकातील कामगिरीमुळे त्यांना वरिष्ठ भारतीय संघातही स्थान मिळाले होते.
विशेष म्हणजे १९ वर्षांखालील विश्वचषकात मिळालेल्या मालिकावीर पुरस्काराबरोबरच युवराज आणि शुभमनमध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे हे दोघेही पंजाब संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतात.
शुभमनने युवराजच्या मार्गदर्शनाबरोबरच नुकताच जिंकलेल्या विश्वचषकाबद्दलही संवाद साधला आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध केलेल्या शतकाबद्दल तो म्हणाला, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दबाव होता. आमच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली होती. तसेच मधल्या फळीही चांगला खेळ करत होती पण आम्ही जेव्हा काही बळी गमावले तेव्हा राहुल द्रविडने मला शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहण्यास सांगितले. माझी अनुकूल रॉयसोबत केलेली भागीदारी चांगली झाली.”
हा विश्वचषक चालू असतानाच आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव पार पडला होता. या लिलावात शुभमनला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. याचा त्याच्यावर काही परिणाम झाला का असे विचारल्यावर शुभमन म्हणाला, “आम्ही या लिलावाच्या आधी बांग्लादेशबरोबर उपांत्यपूर्व सामना खेळलो असल्याने दमलो होतो. जेव्हा उठलो तेव्हा मला समजले मला केकेआरने संघात घेतले आहे. त्यानंतर मी आयपीएलचा विचार करणे सोडून दिले आणि विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले.”
तसेच त्याने सांगितले की संघाने या विश्वचषकात वाईट खेळपट्टीवरही खेळण्याची तयारी केली होती.