जागतिक क्रिकेटमधील सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस आहे. सचिन आज ४८व्या वर्षात पदार्पण करतो आहे. या निमित्ताने अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यातच सचिनचा भारतीय संघातील माजी संघ सहकारी युवराज सिंग याचा देखील समावेश आहे. युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराजने शेअर केला हटके व्हिडिओ
युवराज सिंगने नेहमीच आपण सचिन तेंडुलकरला आदर्श मानत असल्याचे सांगितले आहे. या दोघांनी भारतीय संघाकडून अनेक सामने देखील एकत्र खेळले आहेत. २०११च्या भारताच्या वर्ल्डकप विजयात युवराज आणि सचिन यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे या दोघांमध्ये खास बॉन्डिंग असल्याचे मैदानावर तसेच मैदानाबाहेर देखील दिसून आले आहे.
आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त देखील याचीच प्रचिती आली. युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सचिनच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांना उजाळा देणारा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या सुरुवातीला सचिनच्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काही क्षणांची झलक आहे. त्यानंतर युवराज आणि सचिन यांचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील निवडक लोभस फोटो यात आहेत. ज्यात २०११ क्रिकेट वर्ल्डकपपासून ते अगदी अलीकडे या दोघांनी एकत्र खेळलेल्या वर्ल्ड रोड सेफ्टी सिरीज मधील फोटोंचाही समावेश आहे. युवराजने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
https://www.instagram.com/p/COCQqqOjQUX/?utm_source=ig_embed
आजी-माजी खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा
युवराज व्यतिरिक्त अनेक आजी-माजी खेळाडूंनी देखील सचिनला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सुरेश रैना, ख्रिस गेल, एस बद्रीनाथ, राहुल चाहर, बीसीसीआय सेक्रेटरी जय शहा अशा अनेकांचा यात समावेश आहे. तसेच अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंनी देखील सोशल मिडीयावरून भारताच्या या महान फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा तो मजेदार किस्सा
अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ