भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाल्याची बातमी जेव्हा समोर आली होती, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, या विभक्त होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. आता राज शमानी यांच्या पॉडकास्टदरम्यान चहलने पहिल्यांदाच उघडपणे याबाबत भाष्य करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
चहलने सांगितले की, त्याचे आणि धनश्रीचे नाते खूप काळापासून तणावग्रस्त होते. “आमच्यातील गोष्टी बराच काळ चुकत होत्या. मात्र, आम्ही लोकांसमोर असे वागत होतो की जणू सर्व काही व्यवस्थित आहे. आम्ही ठरवलं होतं की अंतिम निर्णय होईपर्यंत कोणालाही काही सांगणार नाही. जर गोष्टी सुधारल्या नाहीत, तर कदाचित वेगळं व्हावं लागेल. म्हणूनच आम्ही सोशल मीडियावर एक सामान्य कपलसारखे दिसत राहिलो,” असे त्याने सांगितले.
चहल पुढे म्हणाला, “रिलेशन म्हणजे एक समजुतीचा व्यवहार असतो. जर एक जण रागावला तर दुसऱ्याने ऐकून घ्यायला हवे. पण कधी कधी दोन लोकांची फितरतच जुळत नाही. मी भारतासाठी खेळत होतो आणि ती तिच्या कामात व्यस्त होती. रोज-रोज गोष्टी बिघडत होत्या. त्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की सोडून द्यावं.”
घटस्फोटानंतर त्याच्यावर “धोखेबाज” असल्याचा आरोप झाल्याचे चहलने स्पष्ट केले. “मी धोखेबाज नाही. माझ्यापेक्षा जास्त वफादार तुम्हाला कुणी सापडणार नाही. माझ्या दोन बहिणी आहेत; मला महिलांचा सन्मान कसा करावा हे चांगलं माहीत आहे. लोकांना खरी गोष्ट माहिती नसते, म्हणून ते काहीही लिहितात,” असे तो म्हणाला.
चहलने कबूल केले की या तणावामुळे त्याने क्रिकेटपासून काही काळ ब्रेक घेतला होता. “खेळताना देखील माझ्या डोक्यात शंभर विचार चालत होते. मी फक्त दोन-तीन तास झोपायचो. उर्वरित वेळ मित्रांशी बोलण्यात जात असे. या काळात माझ्या मनात आत्महत्येचे विचार देखील आले होते,” असे चहलने सांगितले.






