सध्या क्रिकेटजगतात आयपीएलची चर्चा सुरू आहे. जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू आयपीएल खेळताना दिसत आहेत. त्याचवेळी इंग्लिश क्रिकेट बोर्डाने महत्त्वकांक्षी ‘द हंड्रेड’ या १०० चेंडूंच्या क्रिकेट लीगची तयारी सुरू केली आहे. या नव्या लीगसाठी प्रसारण वाहिन्यांनी जगभरातील प्रसिद्ध अँकरशी करार केले आहेत. आता या यादीमध्ये एका पाकिस्तानी महिला अँकरचे नाव देखील सामील झाले आहे. स्काय स्पोर्ट्स चॅनेलकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ही पाकिस्तानी अँकर दिसणार हंड्रेड लीगमध्ये
बहुप्रतिक्षित ‘द हंड्रेड’ ही इसीबीची नवीन क्रिकेट लीग यावर्षी खेळविण्यात येणार आहे. २०१९ मध्ये घोषणा झालेली ही लीग २०२० मध्ये खेळवली जाणार होती मात्र कोविड-१९ या आजारामुळे पुढे ढकलली गेलेली. ही स्पर्धा स्काय स्पोर्ट्सवरून प्रक्षेपित केली जाईल. यासाठी स्काय स्पोर्ट्स जगभरातील विविध देशांमधील खेळाडू व अँकरशी संपर्क साधत आहे.
नुकतेच स्काय स्पोर्ट्सने पाकिस्तानी महिला अँकर जैनब अब्बास हिच्याशी करार केला. जैनब ही पाकिस्तानमधील सर्वोत्तम स्पोर्ट्स व क्रिकेट अँकरपैकी एक आहे. या करारानंतर तिने प्रतिक्रिया देताना म्हटले, “द हंड्रेड लीगमध्ये युवा जोश आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. आशियाई अँकरचे प्रतिनिधित्व या स्पर्धेत करायला मला आवडेल. मला या नाविन्यपूर्ण स्पर्धेचा भाग होऊन आनंद झाला.”
हे खेळाडू दिसणार समालोचन करताना
स्काय स्पोर्ट्सने ‘द हंड्रेड’ च्या पहिल्या हंगामासाठी आपल्या अँकर व समालोचकांची तगडी फौज उभी केली आहे. जैनबसह कैस नायडू, जॅकलिन शेफर्ड व ऍण्ड्रू फ्लिंटॉफ हे अँकर असतीत. तर, समालोचक म्हणून केविन पीटरसन, कुमार संगकारा, वसीम अक्रम, दिनेश कार्तिक हे पुरुष क्रिकेटपटू आणि मेल जोन्स, टॅमी ब्युमॉन्ट या महिला क्रिकेटपटू काम पाहतील.
अशी असेल स्पर्धा
या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत एका सामन्यात उभय संघांना १०० चेंडू खेळण्यास मिळतील. पहिल्या २५ चेंडूंचा पावर प्ले असेल. या स्पर्धेत इंग्लंडचे सर्व प्रमुख खेळाडू तसेच राशिद खान, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, ऍरॉन फिंच, बाबर आझम व ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दर्जेदार खेळाडू सहभागी होत आहेत. परंतु, बीसीसीआयने एकाही भारतीय खेळाडूला या स्पर्धेसाठी परवानगी दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
SRHच्या गोलंदाजाने मारला अप्रतिम सिक्सर, DCची बॉलिंग बघून लोटपोट झाली ‘मिस्ट्री गर्ल’; पाहा Video
सूर्यकुमारला रिलीज करणे केकेआरची गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, माजी कर्णधाराने साधला निशाणा
“अब हिंदी में नही बोल सकता”, धोनीचा यष्टीमागील संवाद स्टंप माइकमध्ये कैद; पाहा भारी व्हिडिओ






