भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या. यानंतर आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. या मालिकेपूर्वी आपण आयपीएलमधील कामगिरीने दबावमुक्त झाल्याचे, शमीने सांगितले आहे.
आयपीएलमधून मिळाला आत्मविश्वास
शमीने शनिवारी (२१ नोव्हेंबर) बीसीसीआय टीव्हीशी बोलताना म्हटले की, “आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी केलेल्या कामगिरीने मला आत्मविश्वास मिळाला. आणि मला योग्य स्थितीत पोहोचवले आहे.”
आयपीएलमधील कामगिरीने झालो दबावमुक्त
शमीला असे वाटते की, आयपीएलमधये चांगली कामगिरी केल्याने तो दबावमुक्त झाला आहे. तो म्हणाला, “सर्वात मोठा फायदा असा झाला की, आता मी कोणत्याही दबावाशिवाय पुढील मालिकेसाठी तयार करू शकतो. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मला सध्या खूप चांगले वाटत आहे.”
शमीने लॉकडाऊनमध्ये घेतली होती मेहनत
शमीने पुढे सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान आपल्या गोलंदाजीवर त्याने खूप मेहनत घेतली. तो म्हणाला, “मी लॉकडाऊनमध्ये आपल्या गोलंदाजीवर आणि फीटनेसवर खूप काम केले आहे. मला माहिती होते की, आयपीएलचे आयोजन होणारच आहे आणि मी यासाठी स्वत: तयारीत लागलो होतो.”
माझे लक्ष्य कसोटीवर असेल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामना ही त्याची प्राथमिकता असल्याचे त्याने सांगितले. सोबतच तो मागील एका आठवड्यापासून सराव सत्रात जोरदार मेहनत घेत आहे.
तो म्हणाला, “हा दौरा खूप मोठा असेल, याची सुरुवात वनडे मालिकेने होईल. यानंतर गुलाबी आणि लाल चेंडूने कसोटी सामने खेळले जातील. माझे लक्ष्य कसोटीवर आहे. मी आपल्या लेंथ आणि सीम मुव्हमेंटवर काम करत आहे.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमीची कामगिरी
शमी वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात महागडा ठरतो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सामने खेळताना २५ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु त्याचा इकॉनॉमी रेटही ६.०२ प्रति षटक आहे. तरीही ऑस्ट्रेलियामध्ये शमीने केवळ १२ वनडे सामने खेळताना १८ विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेटही केवळ ४.८३ इतका आहे. अशामध्ये भारतीय संघाला २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपासूनच शमीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या ‘रॉकेट थ्रो’ पुढे मुंबईचा धुरंधर झाला घायाळ, व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएलमध्ये गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ सर्वात मोठे आव्हान, मोहम्मद शमीने केला खुलासा
मोहम्मद शमीच्या वाढदिवशी विराट कोहलीने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला