-महेश वाघमारे
भारतीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटची देशांतर्गत क्रिकेट प्रणाली इतकी मोठी आहे की, जवळपास ९०० सामने पूर्ण मोसमात खेळले जातात. २७ क्रिकेट संघटना बीसीसीआयशी संलग्न असल्याने खेळाडू देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास २००० हून अधिक खेळाडू या संघटनांशी करारबद्ध आहेत. देशासाठी १५ मध्ये स्थान मिळण्यासाठी कशा प्रकारची स्पर्धा असेल याचा अंदाज या आकड्यांवरून येतो.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महारथी असलेले अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय संघासाठी खेळू शकले नाहीत अथवा एकदम कमी संधी त्यांना मिळाल्या. अमोल मुजुमदार, रजत भाटिया, मिथुन मन्हास, धीरज जाधव ही अशी काही नावे आहेत ,जी इतर देशांमध्ये जन्माला आली असती तर, त्या देशांसाठी महान खेळाडू म्हणून त्यांनी आपले कारकीर्द संपवली असती.
असाच एक दिल्लीकर खेळाडू होता. वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर प्रमाणे तोदेखील सलामीवीर. सेहवाग व गंभीर राष्ट्रीय संघासाठी खेळू लागल्यानंतर माजी राष्ट्रीय खेळाडू आकाश चोप्रासोबत तो दिल्लीच्या संघाची धुरा वाहू लागला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावा बनवून सुद्धा राष्ट्रीय संघात त्याची वर्णी लागत नव्हती. त्याच्यामागून आलेले, विराट कोहली व ईशांत शर्मा हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत होते. या खेळाडूचे नाव शिखर धवन.
२०१० मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पण केल्यानंतर तो संघाबाहेर होता. चांगली कामगिरी करून देखील संधी मिळत नव्हती. भारताच्या राष्ट्रीय संघात चांगले सलामीवीर असल्याने त्याची जागा बनत नव्हती. तो खूप खचला होता. क्रिकेट सोडावे इतपत त्याने विचार केला.
२०१३ बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला होता. मायकल क्लार्कच्या नेतृत्वात युवा ऑस्ट्रेलिया संघ भारताशी दोन हात करत होता. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने आरामशीर जिंकून चषक आपल्याकडे राखला होता. पुढे अजून दोन सामने होणार होते.
१४ मार्चला तिसरी कसोटी मोहालीत सुरु होणार होती. नियमित सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या खराब फॉर्मुळे त्याला उरलेल्या दोन कसोटीतून वगळण्यात आले होते. सेहवाग प्रथमच खराब फॉर्ममुळे संघाबाहेर जात होता. निवड समितीने त्याचा बदली खेळाडू म्हणून शिखर धवनला निवडले. शिखर ११ तारखेला संघासोबत मोहालीत जोडला गेला. सेहवागला वगळण्याचा वाद सुरू होता. शिखर धवनसुद्धा दिल्लीकर असल्याने दिल्लीकर खुश होते पण इतर चाहते नाराज झालेले.
१४ तारखेला सकाळीच महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते धवनला टेस्ट कॅप देण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी निवडली. परंतु अचानक पाऊस आल्याने पहिल्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व एड कोवान यांनी नांगर टाकला. भारताला पहिल्या सत्रात एकही यश मिळाले नाही. दुसऱ्या सत्रात जडेजाने वॉर्नर व कोवान यांची १३९ धावांची भागीदारी तोडली. क्लार्क आल्या पावली माघारी परतला. स्टीव्ह स्मिथ सोबत थोडाफार संघर्ष करत एड कोवान वैयक्तिक ८६ धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅडिन, हेन्रीक्स व सिडल झटपट बाद झाले. दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया २७३- ७ अशा स्थितीत होती. स्टीव्ह स्मिथ व मिचेल स्टार्क ही जोडी नाबाद राहिली.
तिसऱ्या दिवशी स्टार्क व स्मिथ या नाबाद जोडीने धीरोदात्तपणे भारतीय गोलंदाजांचा सामना केला. दोघांनीही भारतीय गोलंदाजांना चांगले सतावले. स्टीव्ह स्मिथ ९१ धावांवर बाद झाला व स्टार्कने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. संघाच्या ३९९ व वैयक्तिक ९९ धावा झाल्या असताना, तो धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला. पुढे ऑस्ट्रेलिया संघ ४०८ धावांवर सर्वबाद झाला.
लंचनंतर, ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर देण्यासाठी मुरली विजय व पदार्पण करणारा शिखर धवन मैदानात उतरले.
सेहवागच्या जागेवर खेळणे, तब्बल ८४ प्रथमश्रेणी सामने खेळल्यानंतर मिळालेली संधी व ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरुद्ध पदार्पण अशा अनेक बाबींचा दबाव शिखरावर होता. त्याच्यासाठी करा किंवा मरा अशी स्थिती झाली होती.
भारतीय संघाचा डाव सुरु झाला आणि प्रेक्षकांनी ते पाहायला सुरुवात केली जे कसोटी क्रिकेटमध्ये क्वचितच किंबहुना प्रथमच घडले होते. धवनने अगदी पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. १२ चौकारांचे वळ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या पाठीवर उठवत धवनने ५० चेंडूत ५० धावा जमवल्या. अर्धशतकानंतर तो अधिक आक्रमक झाला. धवनने गोलंदाजांवर अजिबात दयामाया न दाखवता ८५ चेंडूत आपले पहिले शतक साजरे केले. शिखरने कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावे केला होता. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या नावे १५६ धावा लागल्या होत्या. यात धवनचे योगदान होते १०६ धावांचे.
चहापानानंतर ही धवन अजिबात थांबला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढत त्याने वैयक्तिक दीडशतक पूर्ण केले. दुसरा सलामीवीर मुरली विजयने देखील अर्धशतक झळकावले. तमाम क्रिकेटचाहते, धवनच्या नावाचा जप करु लागले. धवनचा धडाका पाहता तो दिवस संपण्याआधीच द्विशतक करणार असे वाटले. शेवटी शेवटी स्टार्कने २-३ चांगली षटके टाकल्याने धवन द्विशतक करू शकला नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या झाली होती बिनबाद २८३. धवन १८५ नाबाद.
चौथ्या दिवशी सर्वांना धवनच्या द्विशतकाची आतुरता होती. मात्र, दुसऱ्याच षटकात नॅथन लिओनने त्याला १८७ धावांवर बाद केले. त्याने अवघ्या १७४ चेंडूत या धावा केल्या होत्या.या खेळीत ३३ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. बाद होऊन तंबूत परतताना देखील तो आपल्या मिश्यांवर ताव मारत होता. आजही पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय क्रिकेटरमध्ये त्याच्या नावावर आहे.
पुढे भारताने हा सामना आरामात जिंकला. सेहवागच्या जागेवर संधी मिळालेल्या धवनने, एका खेळीत टीकाकारांची तोंडे बंद करत, यापुढे सेहवागच्या गैरहजेरीत लोक त्याला आठवणार नाहीत, याचा विश्वास या गब्बरने सर्वांना दिला.
टेस्ट इनिंग्स स्पेशल लेखमालिकेतील वाचनीय लेख
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग २- असामान्य खेळाडूकडून झालेली असामान्य खेळी
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग १- दिग्गजांच्या मांदियाळीत गंभीरची ती अजरामर मॅरेथॉन खेळी