पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत 8 संघात 219 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर दि.9मार्चपासून सुरू होणार आहे.
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे आणि क्लबचे मानद सचिव सारंग लागू यांनी सांगितले की, पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग ही अनोखी व नाविन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार असून यामध्ये प्रौढ, पुरूष, महिला आणि कुमार यांचा संघात समावेश असणार आहे. स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
तसेच, या लीगची संकल्पना अभिषेक ताम्हाणे, तन्मय आगाशे, तुषार नगरकर, देवेंद्र चितळे, रणजीत पांडे, तन्मय चोभे, आलोक तेलंग आणि मधुर इंगळहळीकर यांनी अस्तित्वात आणली असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.
क्लबचे मानद सचिव सारंग लागू पुढे म्हणाले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, बॅडमिंटन, फिटनेस आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पीवायसी हिंदू जिमखाना हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना सर्वसाधारण व्यासपीठ उपलब्ध होणार असून मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल.
या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघ तीन साखळी सामने आपल्या गटातील प्रतिस्पर्धीबरोबर खेळणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. या लढतीमध्ये दोन्ही संघात मिळून बॅडमिंटन व टेबल टेनिस प्रकारात आठ सामने आणि टेनिस प्रकारात सात सामने असे एकूण 23 सामने होणार आहेत. तसेच, प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत या तीनही क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी नमुद केले. या तीनही क्रीडा प्रकारात खुल्या दुहेरी गटाचे सामने प्रत्येकी 30 गुणांचे तर, याशिवाय टेनिस प्रकारात 6 व 7चे सामने प्रत्येकी 20गुणांचे असणार आहेत.
रिबाऊंड स्पोर्टस्चे संचालक आलोक तेलंग यांनी सांगितले की, या अनोख्या लीग स्पर्धेमुळे सदस्यांना एकच क्रीडा प्रकारापेक्षा विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या सदस्यांनी खेळणे बंद केले आहे अथवा ज्यांना पुन्हा खेळण्यास सुरूवात करायची आहे, त्यांच्यासाठी ही लीग स्पर्धा महत्वपूर्ण ठरेल. आम्ही आमच्या क्लबच्या सदस्यांना व त्यांच्या कुटूंबियांना पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे सर्वोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास इच्छुक आहे.
स्पर्धेसाठी 219 खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू आठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यामध्ये प्रथम वाणी सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्यानंतर या खेळाडूंमध्ये गौरव भगत, संग्राम पाटील, तेजस किंजवडेकर यांचा समावेश आहे.
स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक
एक्स्कॅलिबर्स्-अभिषेक ताम्हाणे व मधुर इंगळहाळीकर
किर्पान्स – नंदन डोंगरे व तन्मय चोभे
अर्बन कुकरीज्-प्रांजली नाडगोंडे व केदार नाडगोंडे
लान्सर्स – आलोक तेलंग व सिद्धार्थ निवसरकर
रावेतकर मस्कीटर्स – अमोल रावेतकर, पराग चोपडा व आदिती रोडे
समुराईज्-कुणाल पाटील, श्रीतेज दरोडे व आकाश सूर्यवंशी
पंडित जावडेकर तलवार्स-शिवकुमार जावडेकर, अंकित दामले व आर्य देवधर
टेन्कवा कोल्ट्स-अथर्व अय्यर व केदार देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या –
गुजरात टायटन्सला मिळाला जेसन रॉयचा रिप्लेसमेंट, टी२० क्रिकेटमध्ये वेगाने धावा बनवण्यात आहे माहिर
दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना; वाचा सविस्तर
शेन वॉर्नने निवडली होती भारताची सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हन, विराट-धोनीला दिले नव्हते स्थान, पाहा संघ