२००८ मध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच या स्पर्धेत फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. आयपीएलमध्ये चाहत्यांना बरेच चौकार-षटकार पाहायला मिळतात. यामुळेच ही लीग जगभरात लोकप्रिय झाली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज खेळडूंनी आपला खेळ दाखवला आहे. काही दिग्गज फलंदाजानी या स्पर्धेत अनेक धावा केल्या आहेत. सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांसारख्या फलंदाजांची गणना यशस्वी फलंदाजांमध्ये केली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
या स्पर्धेत असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी अतिशय वेगवान धावा करून विक्रम नोंदविला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करून या फलंदाजांनी प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या उभारली आणि यामुळेच त्यांनी जलद गतीने १०००- २००० धावांच्या टप्पा पार केला.
या लेखात त्या ३ भारतीय फलंदाजांविषयी चर्चा करू ज्यांनी आयपीएलमध्ये वेगवान २ हजार धावा केल्या आहेत. असा विक्रम करणारे अनेक महान फलंदाज आहेत. जाणून घेऊया ते ३ भारतीय खेळाडू कोण आहेत.
आयपीएलमध्ये वेगवान २ हजार धावा करणारे ३ भारतीय खेळाडू
३. गौतम गंभीर-
या यादीत तिसर्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरचे नाव आहे. गौतम गंभीर आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वात केकेआरच्या संघाला २ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. या व्यतिरिक्त त्याची फलंदाजीही जबरदस्त होती.
आयपीएल कारकिर्दीत गौतम गंभीरने १५४ सामन्यात ३१.२३ च्या प्रभावी सरासरीने ४२१७ धावा केल्या आहेत. या दरम्यान गौतम गंभीरने अवघ्या ६८ डावांमध्ये २ हजार धावा केल्या. गंभीर हा आधी दिल्ली डेअरडेविल्स संघाचा एक भाग होता. त्यानंतर तो केकेआर संघात सामील झाला आणि त्यानंतर पुन्हा दिल्ली संघात सहभागी झाला. परंतु, दुसऱ्यांदा दिल्ली संघातून खेळताना तो यशस्वी झाला नाही आणि त्यानंतर त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली.
२. सचिन तेंडुलकर-
या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज सलामीवीर सचिन तेंडुलकर दुसर्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या सुरुवातीला सचिन तेंडुलकरने बऱ्याच धावा केल्या होत्या. आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने एकच सामना खेळला असला, तरी तो आयपीएलमध्ये खूप यशस्वी झाला होता.
सचिन तेंडुलकरने अवघ्या ६३ डावांमध्ये २ हजार धावांचा टप्पा पार केला असून आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर होता. अलीकडेच केएल राहुलने त्याचा विक्रम मोडला. २० मे २०१२ रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.
१. केएल राहुल-
सध्याचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या शतकी खेळीदरम्यान त्याने हा विक्रम केला.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता ज्याने ६३ डावांमध्ये २ हजार धावा केल्या होत्या. पण केएल राहुलने केवळ ६० डावात २ हजारांहून अधिक धावा केल्या.