कसोटी क्रिकेटमध्ये एका खेळाडूच्या जीवावर सामना जिंकता येत नाही. या स्वरुपात सांघिक प्रयत्नांशिवाय सामना जिंकणे जवळ जवळ अशक्य असते. पण बऱ्याचदा खेळाडू भन्नाट फॉर्ममध्ये असतो आणि तो संघाला एकहाती सामना जिंकूनही देतो. भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास पाहिला तर बरेच दिग्गज खेळाडू होऊ गेले आहेत, ज्यांनी या प्रकारात अफलातून कामगिरी केली आहे. राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सुनील गावस्करसारख्या खेळाडूंनी तर कसोटी क्रिकेटला नवी ओळख दिली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये धावा बनवणे किंवा विकेट्स घेणे सोपे काम नसते. धावा बनवण्यासाठी फलंदाजांना अतिशय संयमाने फलंदाजी करायची असते; तर गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी सतत योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करायची असते. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणे म्हणजे काही सोपे काम नसते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. तरीदेखील असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांनी हा पुरस्कार बऱ्याचदा जिंकला आहे.
आज आपण कसोटी क्रिकेटमधील अशाच सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी सर्वाधिकवेळा ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकला आहे.
3. अनिल कुंबळे
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, माजी कर्णधार आणि महान गोलंदाज अनिल कुंबळे. त्याने भारतातर्फे सर्वाधिक विकेट्स (६१९) घेतल्या आहेत. याशिवाय तो जगातील सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने अनेकदा स्वतःच्या बळावर संघाला सामना जिंकवून दिले आहेत.
अनिल कुंबळेने 1990 ते 2008 या 18 वर्षांच्या कारकिर्दीत 132 कसोटी सामने खेळले असून यादरम्यान त्याला 10 वेळेस सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
2. राहुल द्रविड
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा “द वॉल” अर्थात राहुल द्रविड आहे. ज्या ज्या वेळी संघ संकटात असायचा त्या त्या वेळी राहुल द्रविड एका बाजूने लढायचा आणि संघाला संकटातून बाहेर काढायचा. राहुल द्रविडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 164 सामने खेळला असून यादरम्यान त्याला 11 वेळेस समानावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
1. सचिन तेंडुलकर
भारतातर्फे सर्वाधिक कसोटी समानवीरांचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याला 200 कसोटी सामन्यात 14 वेळेस समानवीर पुरस्कार मिळाला आहे. सचिनच्या नावे कसोटीमध्ये सर्वाधिक ‘धावा’ आणि ‘शतके’ जमा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सिक्स मास्टर! असे ४ सलामीवीर, ज्यांनी टी२०च्या पहिल्या षटकात ठोकले भरपूर षटकार
लंकादहन केल्यानंतर ३ भारतीय क्रिकेटर धरणार इंग्लंडची वाट, ‘अशी’ राहिलीय त्यांची प्रथम श्रेणी कामगिरी
मला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची अपेक्षा होती; ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूने व्यक्त केली खंत