मागील अनेक वर्षांपासून भारताचा सलमीवीर फलंदाज रोहित शर्मा भारताच्या वनडे आणि टी२० संघाचे उपकर्णधारपद सांभाळत आहे. तसेच त्याने अनेकदा भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाचे चांगले नेतृत्वही केले आहे. तसेेच रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या ४ मोसमांचे आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. तो आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे.
आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करत असताना त्याच्या नेतृत्त्वाखाली काही युवा खेळाडू सर्वांसमोर आले. या खेळाडूंनी केवळ आयपीएलमध्येच छाप पाडली नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करत आहेत. तसेच ते भारतीय संघासाठी मॅचविनर खेळाडूही झाले आहेत. अशाच ३ खेळाडूंबद्दल या लेखात आढावा घेणार आहोत, जे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तयार झाले.
१. जसप्रीत बुमराह –
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या भारताचा अव्वल क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे. पण बुमराह सर्वात आधी प्रकाशझोतात आला तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघात असताना. त्याला २०१२-१३ च्या दरम्यान सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना जॉन राईट यांनी पाहिले आणि त्यांनी त्याला मुंबई इंडियन्समध्ये सामील करुन घेतले. त्यानंतर बुमराहने २०१३ ला आयपीएलमध्ये पदार्पण केले. याच दरम्यान रोहित शर्मानेही मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हाती घेतले होते.
हळूहळू बुमराहने रोहितच्या नेतृत्वाखाली आणि लसिथ मलिंगाचे मार्गदर्शन घेत प्रगती केली. त्याने सुरुवातीला ३ मोसमात खेळताना प्रभावित केले. त्यानंतर त्याला २०१६ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र बुमराहने मागे वळून पाहिले नाही. आज बुमराह भारताकडून तिन्ही प्रकारात खेळत आहे. याचे श्रेय रोहित शर्मालाही जाते. त्याने मुंबई इंडियन्समध्ये असताना बुमराहवर विश्वास ठेवला.
बुमराहने आत्तापर्यंत १४ कसोटी, ६४ वनडे आणि ४९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ६८ विकेट्स, वनडेत १०४ आणि टी२०मध्ये ५९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बुमराहने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये ७७ सामने खेळले असून ८२ विकेट्स घेतल्या आहेत.
२. हार्दिक पंड्या –
भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याही पहिल्यांदा प्रकाश झोतात आला तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना. त्याच्या मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि वेगवान गोलंदाजी पाहून त्याला २०१५ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने त्याला पहिल्यांदा संधी दिली. त्यानंतर हार्दिकनेही त्यांना कधी निराश केले नाही. त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करताना दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारण्याचा कारनामा केला होता.
हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याने २०१६ मध्ये भारतीय संघातही प्रवेश केला. त्याने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला २०१६ च्या टी२० विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली. आता तो भारतीय संघातील महत्त्वाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे.
हार्दिकने आत्तापर्यंत भारताकडून खेळताना ११ कसोटी सामन्यात ५३२ धावा केल्या तर ५४ वनडेत सामन्यात ९५७ धावा केल्या आहेत. ४० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ३१० धावा केल्या आहेत. यासोबतच गोलंदाजीत त्याने कसोटीत १७ वनडेत ५४ आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये ६६ सामने खेळले असून १०६८ धावा केल्या असून ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
३. कृणाल पंड्या –
हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या देखील मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळतो. त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये २०१६ मध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच मोसमात २३७ धावा आणि ६ विकेट्स घेतल्या. त्याने पुढेही रोहितच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. त्याने २०१७ ला अंतिम सामन्यातही दबावाखाली शानदार कामगिरी करताना चांगली कामगिरी केली होती.
पण चांगली कामगिरी करुनही त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती. पण अखेर त्याला २०१८ वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०मध्ये ४ विकेट्स घेत त्याची सर्वोत्तम कामगिरीही केली.
कृणालने आत्तापर्यंत १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १२१ धावा केल्या असून १४ विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून ५५ सामने खेळले असून ८९१ धावा केल्या असून ४० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद…
आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी
धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी
महत्वाच्या बातम्या –
कसोटी सामन्याच्या एका डावात ३५० पेक्षा जास्त धावा करणारे ५ फलंदाज
आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा
युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश