कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात आश्चर्यकारक विक्रम आहेत. कसोटीमध्ये जर सर्वात कमी धावसंख्येबद्दल चर्चा केली तर गेल्या ६५ वर्षांपासून हा विक्रम न्यूझीलंडच्या नावे आहे. १९५५ मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त २६ धावांवर संपूर्ण न्यूझीलंड संघ बाद झाला होता. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २२ वेळा संघ ५० पेक्षा कमी धावांवर बाद झाले आहेत.
भारतीय संघही १९७४ मध्ये इंग्लंडविरूद्ध ५० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला होता. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा संपूर्ण संघ ४२ धावा सर्वबाद झाला होता.
आज जाणून घेणार आहोत एका अनोख्या विक्रमाबद्दल जो फक्त ३ संघांच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे चार वेळा झाले आहे जेव्हा एखादा संघ एकाच दिवसात दोनदा सर्वबाद झाला होता, म्हणजेच एकाच दिवसात त्यांच्या २० विकेट्स गेल्या होत्या. झिम्बाब्वेने दोनदा हा नकोसा विक्रम केला आहे.
एक संघ एकाच दिवसात दोन्ही कसोटी डावात सर्वबाद झाल्याच्या घटना –
१. भारतीय संघ (धावा- ५८ आणि ८२) – मँचेस्टर १९५२
जुलै १९५२ मध्ये मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ एकाच दिवसात दोनदा सर्वबाद झाला होता आणि असा विक्रम नोंदविणारा पहिला संघ ठरला होता. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३४७/९ धावा केल्या होत्या. त्या कसोटीच्या तिसर्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ पहिल्या डावात फक्त ५८ आणि दुसऱ्या डावात ८२ धावा काढून सर्वबाद झाला होता. त्यामुळे इंग्लंडने एक डाव आणि २०७ धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला होता.
२. झिम्बाब्वे (धावा- ५९ आणि ९९) – हरारे २००५
ऑगस्ट २००५ मध्ये झिम्बाब्वेचा संघ हरारे येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात एकाच दिवसात दोनदा सर्वबाद झाला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ बाद ४५२ धावा केल्या होत्या. कसोटीच्या दुसर्या दिवशी झिम्बाब्वेने पहिल्या डावात सर्वबाद ५९ धावा केल्या आणि फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात ९९ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने एक डाव आणि २९४ च्या मोठ्या फरकाने त्या सामन्यात विजय मिळवला.
३. झिम्बाब्वे (५१ आणि १४३) – नेपियर २०१२
जानेवारी २०१२ मध्ये झिम्बाब्वेने न्यूझीलंडच्याच विरुद्ध दुसऱ्यांदा हा विक्रम केला. नेपियर येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ४९५ धावा केल्या, ज्याला उत्तर म्हणून झिम्बाब्वे कसोटीच्या तिसर्या दिवशी पहिल्या डावात सर्वबाद ५१ धावा केल्या आणि फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात १४३ धावा काढून सर्व संघ बाद झाला. ५१ ही झिम्बाब्वेची कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. न्यूझीलंडने हा सामना डाव आणि ३०१ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
४. अफगाणिस्तान (१०९ आणि १०३) – बंगलोर २०१८
अफगाणिस्तानने जून २०१८ मध्ये भारताविरुद्ध बंगळुरुला खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्यांना त्या सामन्यात एक डाव आणि २६२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्कारावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या होत्या. त्याच्या उत्तरात सामन्याच्या दुसर्या दिवशी अफगाणिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद १०९ धावा केल्या. त्यानंतर भारताने त्यांना फॉलोऑन दिला. या नंतर अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या डावात १०३ धावा करून संपूर्ण संघ सर्वबाद झाला होता.