भारतात कोविड-१९ या महामारीचा विळखा पडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतभर लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष १८ च्या पुढील लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे शनिवारी (०८ मे) भारतीय कसोटी अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबद्दल त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
यादवपुर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनीही कोरोनाची लस टोचवून घेतली आहे.
३३ वर्षीय गोलंदाज यादवने लस घेतानाचा आपला फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोत यादव आणि त्याला लस देणाऱ्या डॉक्टरने मास्क घातला असल्याचे दिसत आहे. या फोटोवर कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘कोरोनाची लस घेतली. आम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. माझी सर्वांना विनंती आहे की, तुम्हाला संधी मिळाल्यास लवकरात लवकर लस घ्या.’
रहाणे आणि धवननेही घेतली लस
यादवने लस टोचून घेण्याच्या काही तासांपुर्वीच मराठमोळ्या रहाणेने लसीचा पहिला डोस घेतला होता. ७ मे रोजी घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रहाणे व त्याची पत्नी राधिका रहाणेने कोरोनाची लस घेतली होती. तसेच धवनने सर्वप्रथम ६ मे रोजी कोरोनाची लस घेतली होती.
या सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लस घेतली होती. त्यावेळी ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत होती. सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे.
Vaccination done ✔️
A big thank you to all our health care workers and I urge everyone to get vaccinated when you get the opportunity. 🙏 pic.twitter.com/kqJMtomer0— Umesh Yaadav (@y_umesh) May 8, 2021
भारतीय कसोटी संघात झाली निवड
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापतीमुळे अनुभवी वेगवान गोलंदाज यादवला माघार घ्यायला घ्यावी लागली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर हा खेळाडू लयीत नसल्याचे दिसून आले. याच कारणामुळे आयपीएल २०२१ मध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
असे असले तरीही, त्याला जूनमध्ये होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय कसोटी संघात जागा देण्यात आली आहे. अशात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास यादव नक्कीच दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिला डोस; शिखर धवनपाठोपाठ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने घेतली कोरोना लस
शिखर धवनने घेतली कोरोनाची लस; फोटो शेअर करत म्हणाला…
आधी वजन कमी कर, मग निवडीचा विचार करू; बीसीसीआयचा ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला इशारा