ब्रिटिश राजा किंवा राणी हे एखाद्या व्यक्तीने केलेल्या उत्कृष्क कामगिरीबद्दल देशाच्या विशिष्ठ पदवीने (नाईटहूड) सन्मान करतात. हे प्रतिष्ठित पदक आपल्याला मिळावे असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. परंतु खूप कमी लोकांना ही मान मिळतो. हा मान मिळाल्यानंतर त्या व्यक्तींच्या नावापुढे ‘श्री’ ऐवजी ‘सर’ असे लावले जाते.
आत्तापर्यंत असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत ज्यांना नाईटहूड ही मानाची पदवी मिळाली आहे. यातील काही क्रिकेटपटू इंग्लंडचे आहेत, तर काही क्रिकेटपटू बाहेरच्या देशातीलही आहेत. ज्या क्रिकेटपटूंना ही पदवी मिळाली आहे, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत क्रिकेटमध्ये मोठे योगदान देत शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्या याच योगदानासाठी या क्रिकेटपटूंना नाईटहूडची अर्थात सर ही पदवी दिली गेली आहे.
या लेखात अशाच पाच प्रसिद्ध क्रिकेटपटूंची माहिती दिली आहे, ज्यांना सर ही पदवी मिळाली.
१. सर व्हिव्हियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards)
महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटला आपल्या फलंदाजीच्या जोरावर विशिष्ठ उंचीवर नेले. त्यांनी बऱ्याचवेळा एकहाती सामने जिंकून दिलेत आणि कठीण प्रसंगातून संघाला बाहेर काढलं आहे.
रिचर्ड्स यांनी १२१ कसोटी सामन्यांमध्ये २४ शतकांसह ५०.२३ च्या सरासरीने ८,५४० धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्यांनी ५० पैकी २७ कसोटी सामने जिंकले आणि केवळ ८ गमावले. वनडेत त्यांनी जवळपास ७,००० धावा केल्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३६,००० पेक्षा जास्त धावा केल्यात.
क्रिकेटमध्ये त्यांच योगदान खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांना १९९९मध्ये नाईटहूडची पदवी देण्यात आली. आज रिचर्ड्स अधूनमधून क्रिकेट समालोचक करत असतात आणि वेस्ट इंडिज संघाचे सल्लागार आहेत.
२. सर क्लाइव्ह लॉयड (Sir Clive Lloyd)
वेस्ट इंडिज संघाचे महान माजी कर्णधार सर क्लाइव्ह लॉयड हे तुफानी फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. ७०-८० च्या दशकात वेस्ट इंडिज संघचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केलं.
त्यांनी ३ विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले आणि १९७५ आणि १९७९ मध्ये २ विश्वचषक जिंकले. उल्लेखनीय म्हणजे, ते एकमेव विंडीज कर्णधार आहेत ज्यांनी आपल्या देशाला २ विश्वचषक जिंकून दिले. तसेच त्यांनी कसोटी संघाचं देखील यशस्वी नेतृत्व केले. १९६६ पासून १९८५ पर्यंत ११० कसोटी सामने आणि ८७ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण ९००० धावा केल्या आहेत.
खेळाडू म्हणून कारकिर्दीनंतर त्यांनी मॅच रेफरी म्हणून काम केले. मॅचरेफरी म्हणून त्यांनी १९९० ते २००८ पर्यंत काम केलं.
क्रिकेटमध्ये केलेल्या विशिष्ट सेवेबद्दल त्यांना २०२० या नवीन वर्षांमध्ये “सर” म्हणून सन्मानित करण्यात आलं.
३. सर अॅलिस्टर कुक (Sir Alastair Cook)
माजी क्रिकेटर अॅलिस्टर कुक हा इंग्लंडचा आतापर्यंतचा महान कसोटी सलामीवीर आहे. त्याच्याकडे नवीन चेंडूंचा सामना करण्याची उत्तम क्षमता आहे.
कुकने इतर इंग्लिश फलंदाजांपेक्षा जास्त कसोटी शतके केली आहेत. इंग्लंड क्रिकेट इतिहासात १०,००० कसोटी धावा काढणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. एकूणच कुकने १६१ कसोटी आणि ९२ वनडे सामने खेळले असून कसोटीत १२,४७२ धावा आणि वनडेत ३२०४ धावा केल्या आहेत.
त्याने २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तरुण वयातच म्हणजे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१९ मध्ये या माजी कसोटी कर्णधाराला “सर” म्हणून सन्मानित करण्यात आले.
४. सर इयान बॉथम (Sir Ian Botham)
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बॉथमही क्रिकेट इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडू आहेत. ते डावखुरे आक्रमक फलंदाज होते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करायचे. ते स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते.
त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी १०२ कसोटी आणि ११६ वनडे सामने खेळले. त्यात त्यांनी कसोटीत ५२०० धावा आणि ३८३ बळी तर वनडेत २११३ धावा आणि १५४ बळी घेतले. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी आपल्या कारकीर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही. हा एक दुर्मिळ विक्रम त्यांच्या नावे आहे.
इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने ऍशेस कसोटी मालिकेतील विजयासह अनेक आश्चर्यकारक विजय मिळवून दिले आहेत. १९९२ मध्ये त्यांनी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. २००७ मध्ये त्यांना क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल “सर” ही पदवी देण्यात आली.
५. सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman)
आतापर्यंत क्रिकेट इतिहासातील कोणत्याही खेळाडूला डॉन ब्रॅडमनच्या क्षमतेची बरोबरी करता आली नाही. खरं तर दुसरा ब्रॅडमन होऊ शकत नाही, असे अनेकदा म्हटले जाते. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले.
त्यांना १९२८-१९४८ च्या दशकात “रन मशीन” म्हणून ओळखले जायचे. त्यांनी २३४ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात २८,०६७ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वाधिक नाबाद ४५२ धावा आहेत
१९४९ मध्ये ब्रॅडमन यांना ब्रिटीश सरकारकडून प्रतिष्ठित ‘नाईटहूड’ हा सन्मान मिळाला. हा मान मिळवणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले होते.
वाचनीय लेख –
असे ५ क्रिकेटपटू ज्यांनी सिद्ध केले वय हा केवळ एक आकडा आहे
५ क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले आहे यष्टीरक्षण, पण अनेकांना माहितीही नाही
असे ३ भारतीय फलंदाज जे भविष्यात करु शकतात रोहित शर्माप्रमाणे फलंदाजी