क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळण्यासाठी प्रत्येक क्रिकेटपटू आतुर असतो. प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुचे लॉर्ड्सवर खेळणे हे एक स्वप्न असते. फलंदाज असेल तर शतक आणि गोलंदाज असेल तर एका डावात पाच बळी मिळवून, लॉर्ड्सवरील ‘ऑनर्स बोर्ड’ वर आपले नाव पाहण्याची सुप्त इच्छा प्रत्येक खेळाडूमध्ये असते.
या ‘ऑनर्स बोर्ड’ वर सर डॉन ब्रॅडमन, सर गारफील्ड सोबर्स, विव रिचर्ड्स, मार्टिन क्रो, राहुल द्रविड या दिग्गजांनी आपले नाव कोरले. याचसोबत, काही सामान्य खेळाडू सुद्धा ‘ऑनर्स बोर्ड’ वर आपले नाव झळकवण्यात यशस्वी ठरले. परंतु, क्रिकेट जगतात असेही काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना त्या मानाच्या जागेवर आपले नाव लिहिता आले नाही.
अशाच ५ सर्वकालीन महान फलंदाजांविषयी आज या लेखात जाणून घेऊ ज्यांना लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नोंदवता आले नाही –
१) सुनील गावसकर
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेले भारतीय खेळाडू सुनील गावसकर हे लॉर्ड्सवर कधीही शतक झळकावू शकले नाहीत. लॉर्ड्सवर गावस्कर यांनी पाच कसोटी सामने खेळले. यात दोन वेळा त्यांनी अर्धशतकाची वेस ओलांडली. मात्र, शतकापासून ते दूरच राहिले. लॉर्ड्सवर त्यांची सर्वोच्च धावसंख्या ५९ इतकी राहिली.
गावसकर यांनी इंग्लंडमध्ये १६ कसोटी सामने खेळत ११५२ धावा जमविल्या. यात ४ शतकांचा समावेश होता. १९८७ मध्ये गावसकर यांनी, विश्व एकादशसाठी खेळताना एमसीसी विरुद्ध लॉर्ड्सवर १८८ धावांची खेळी केली. पण, तो सामना आंतरराष्ट्रीय नसल्याने, त्यांचे नाव ‘ऑनर्स बोर्ड’ वर लागू शकले नाही.
२) मॅथ्यू हेडन
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन हादेखील कधीही लॉर्ड्सवर शतक बनवू शकला नाही. हेडनने इंग्लंडमध्ये १० कसोटी खेळताना एका शतकाच्या साह्याने ५५२ धावा बनविल्या. त्याला लॉर्ड्स मैदानावर खेळलेल्या तीन सामन्यात एकदाही शतक बनवता आले नाही. त्याची लॉर्ड्सवरील सर्वोच्च धावसंख्या ३४ आहे. हेडन कायमच इंग्लंडमध्ये धावांसाठी संघर्ष करत असलेला दिसला.
३) ब्रायन लारा
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून अनेक विक्रमांना गवसणी घालणारा वेस्ट इंडीजचा सर्वकालीन महान फलंदाज ब्रायन लारा हा देखील कधीही लॉर्ड्सवर शतक करू शकला नाही. कसोटी क्रिकेटमधील एका डावात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा (४००) विक्रम नावावर असलेल्या लाराने, लॉर्ड्सवर ६ कसोटी खेळताना, अवघ्या १२६ धावा बनवल्या आहेत. यात एक अर्धशतक समाविष्ट आहे. लाराची लॉर्ड्सवर असलेली २२.६६ सरासरी, त्याच्या आंतरराष्ट्रीय सरासरी ५२.८८ पेक्षा खूपच कमी आहे.
४) सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक नावावर असलेल्या सचिनला लॉर्ड्सवर मात्र, आपली बॅट उंचावता आली नाही. इंग्लंडच्या पाच दौऱ्यांवर सचिनने पाच सामने या ऐतीहासिक मैदानावर खेळले. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त ३७ इतकी होती.
आपले आदर्श सुनील गावसकर यांच्याप्रमाणे, सचिननेदेखील १९९८ मध्ये, एमसीसीकडून खेळताना, विश्व एकादश विरुद्ध १२५ धावांची शतकी खेळी केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय सामन्यात तो हा कारनामा करू शकला नाही.
५) जॅक कॅलिस
सचिन तेंडुलकर व रिकी पॉंटिंग यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा नावावर असलेल्या, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला देखील लॉर्ड्स मैदानावरील ‘ऑनर्स बोर्ड’ वर आपले नाव लिहिता आले नाही. कॅलिसने लॉर्ड्सवर तीन सामने खेळताना अवघ्या ५४ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे
ओपनिंगला येऊन भारताकडून विरोधी संघाला सळो की पळो करुन सोडत केलेल्या ३ भागीदाऱ्या
जगातील आजपर्यंतचा सर्वात महान क्रिकेटर, केल्या होत्या १९९ शतकांच्या मदतीने ६१७६० धावा
महत्त्वाच्या बातम्या –
२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला धोनी म्हणतो, काय रे म्हाताऱ्या
३७ चेंडूत खणखणीत शतक करताना आफ्रिदीने वापरली होती या भारतीय क्रिकेटरची बॅट