दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेची शुक्रवारी (१४ जानेवारी) सांगता झाली. केपटाऊन येथे झालेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकत यजमान दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने मालिकेवर आपले नाव कोरले. ३ सामन्यांची मालिका चांगलीच रोमांचक ठरली. दोन्ही संघांनी एकमेकांना तुल्यबळ लढत दिली. पण, पहिल्या कसोटीत विजय मिळत शानदार सुरुवात करणाऱ्या पाहुण्या भारतीय संघावर अखेरच्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत वर्चस्व गाजवले.
दरम्यान, भारतीय संघासाठी या मालिकेतील पराभवासाठी फलंदाजांची कामगिरीही कारणीभूत ठरली. अनुभवी फलंदाज संघात असूनही भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आज या लेखात आपण अशाच ३ फलंदाजांबद्दल जाणून घेऊ, ज्यांच्या खराब कामगिरीचा फटका भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बसला.
१. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
भारताचा कसोटीतील दिग्गज खेळाडू म्हणून चेतेश्वर पुजाराला ओळखले जाते. त्यामुळे कसोटीत खेळताना नेहमीच त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असते. मात्र, दक्षिण आफ्रिकेत तो या अपेक्षांवर खरे उतरू शकला नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही आशादायी खेळी केल्या मात्र, त्याला त्या खेळींचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही.
त्याने पहिल्या कसोटीत ० आणि १६, दुसऱ्या कसोटीत ३ आणि ५३ व तिसऱ्या कसोटीत ४३ आणि ९ अशा मिळून ६ डावात २०.६७ च्या सरासरीने १२४ धावाच केल्या. त्यामुळे त्याची ही कामगिरीही भारतासाठी नुकसानीची ठरली.
२. मयंक अगरवाल (Mayank Agarwal)
रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे मयंक अगरवालची कसोटी मालिकेसाठी केएल राहुलबरोबर सलामीची जागा अंतिम ११ मध्ये पक्की झाली होती. मात्र, अगरवालला या संधीचा हवा तसा फायदा घेता आला नाही. त्याचे ६ डावात ६० धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. याव्यतिरिक्त त्याला अन्य ५ डावात फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने जर सलामीला चांगली सुरुवात दिली असती, तर मधल्या फळीला खुलून खेळण्याचे स्वातंत्र्य मिळू शकले असते.
मयंकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ डावात १ अर्धशतकासह २२.५० च्या सरासरीने १३५ धावा केल्या.
३. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत खराब कामगिरी झालेल्या फलंदाजांमध्ये अजिंक्य रहाणेचेही नाव येते. मधल्या फळीला स्थिरता देणारा फलंदाज म्हणून आजपर्यंत रहाणेकडे पाहिले गेले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तो संघर्ष करताना दिसून आला. त्याला केवळ एकदाच ५० धावांचा टप्पा पार करता आला. तो देखील पुजाराप्रमाणेच खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
त्याने पहिल्या कसोटीत ४८ आणि २०, दुसऱ्या कसोटीत ० आणि ५८ व तिसऱ्या कसोटीत ९ आणि १ असे ६ डावात मिळून २२.६७च्या सरासरीने १३६ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचाही फटका भारतीय संघाला बसला.
महत्त्वाच्या बातम्या –
अजब गजब! दोन वेगवेगळ्या देशात स्टेडियम असल्यामुळे रद्द करावा लागला सामना, कारणंही आहे तसंच
बदल होणारच! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून होणार भारतीय क्रिकेटची ‘नवी सुरुवात’
आयपीएल २०२२ साठी सीएसकेने निवडला कर्णधार धोनीचा उत्तराधिकारी? यंदा सांभाळणार संघाची कमान
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?