कोराना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता सध्या भारतासह अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचमुळे क्रीडा स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धाही सध्या स्थगित केल्या आहेत.
पण असे असले काही देशात क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. या देशांमधील वानुआतु हे एक दक्षिण प्रशांत क्षेत्रातील बेट आहे जिथे शनिवारी देशांतर्गत महिला क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्याचे आयोजन होणार आहे. वानुआतु हा एकमेव देश आहे जिथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे.
त्यामुळे वानुआतु क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन डेट्झ यांनीही सर्वांना हा सामना बघण्यासाठी आंमत्रित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की जर कोणाला क्रिकेट सामने लाईव्ह पहाण्याची कमी जाणवत असेल तर ते हा सामना पाहू शकतात. हा सामना वानुआतु क्रिकेट असोसिएशनच्या फेसबुक पेजवर प्रसारित करण्यात येणार आहे.
महिलांच्या स्पर्धेत सकाळी टफेआ ब्लॅकबर्ड्स आणि पॉवर शार्क्स या संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम सामन्यात मेले बुल्स संघाशी सामना खेळेल. तसेच पुरुषांचा एक प्रदर्शनी सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरु होईल. त्यानंतर महिलांच्या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.
वानुआतुमध्येही कोरोना व्हायरसमुळे मागील महिन्यातच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन होते. तसेच येथे ६ एप्रिलला मोठे वादळ देखील आले होते. पण त्यांनी त्यांच्या सीमा बंद केल्यापासून त्यांच्याकडे एकही कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे त्यांच्या येथील लॉकडाऊन काढण्यात आले आहे. त्याचमुळे सध्या तेथील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
वानुआतु क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेन डेट्झ यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियात १० वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. त्यानंतर ते न्यूझीलंडला प्रशिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी गेले. त्यानंतर बांगलादेशमध्येही ते गेले होते. आता ५ वर्षांपासून ते वानुआतुमध्ये राहत आहेत. त्यांनी वानुआतुकडून २०१८ मध्ये खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले.
वानुआतुमध्ये क्रिकेट वाढावे असे त्यांचे ध्येय आहे. तसेच वानुआतु महिला क्रिकेट संघ सध्या २८ व्या क्रमांकावर आहे. त्या संघातील खेळणाऱ्या अनेक खेळाडू उद्या होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
लाॅकडाऊनमध्ये शिखर धवन ९९ धावांवर बाद, शतकी खेळीचे स्वप्न भंगले
आयपीएलमध्ये ४ हजार धावा करणारे ७ भारतीय तर ३ परदेशी खेळाडू
क्रिकेटमध्ये योग्य वेळेची वाट पहात खेळाडूंनी जशात तसे उत्तर दिलेल्या ४ घटना