इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघ कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पार केल्यानंतर वनडे मालिकेच्या तयारीला लागले आहेत. यजमान भारताने कसोटी मालिका ३-१ ने खिशात घातली, तर टी२० मालिकेत ३-२ ने बाजी मारली. यानंतर २३ मार्चपासून भारत आणि इंग्लंड संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. हे सामने महाराष्ट्र क्रिकेट असेसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या टी२० मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. २३१ धावांसह तो या टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतही त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची सर्वांना अपेक्षा असणार आहे.
परंतु तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर जमा आहे? चला तर जाणून घेऊया…
‘या’ दिग्गजाने पाडलाय धावांचा पाऊस
माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीने भारत-इंग्लंड वनडे सामन्यात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याने २००६ ते २०१९ दरम्यान इंग्लंडविरुद्ध ४८ वनडे सामने खेळले आहेत. त्यातील ४४ डावात फलंदाजी करताना ४६.८४ च्या सरासरीने त्याने सर्वाधिक १५४६ धावा केल्या आहेत. त्याने या धावा एक शतक आणि ५० अर्धशतकांच्या मदतीने जोडल्या आहेत. याबरोबरच यात १२९ चौकार आणि ३४ षटकारांचाही समावेश आहे.
असे असले तरीही, धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने विराटला हा किर्तीमान आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
विराट कोहली आहे टॉप-५ मध्ये
धोनीनंतर भारत-इंग्लंड वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी अष्टपैलू युवराज सिंगचा क्रमांक लागतो. तो ३७ सामन्यातील १५२३ धावांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ३७ सामन्यात १४५५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाचा चौथा क्रमांक लागतो. तो ३७ सामन्यात १२०७ धावांसह या क्रमांकावर आहे. तर विराटने ३० सामन्यांत ११७८ धावा करत पाचव्या स्थानावर ताबा मिळवला आहे.
विराटव्यतिरिक्त या यादीत, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग असलेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा १७ व्या स्थानावर आहे. त्याने १३ सामन्यात ४५४ धावा केल्या आहेत. त्यामुळे टॉप-५ मध्ये उडी घेण्यासाठी त्याला बराच कालावधी लागणार आहे. मात्र विराट आधीपासूनच टॉप-५ मध्ये असल्याने आणि त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला पहिल्या स्थानावर ताबा मिळवणे सोपे जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे शिक्षा; ‘या’ कारणामुळे आयसीसीने भारतावर ठोठावला दंड
भविष्यात विराट कोहलीबरोबर सलामीला फलंदाजी करण्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर
युवी..युवी!! स्टेडियममध्ये प्रोस्ताहन देणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ शेअर करत युवराज म्हणाला….