James Anderson :- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला अनुभवी इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसनने फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अँडरसन 10 वर्षांपूर्वी शेवटचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर आता त्याला पुनरागमन करायचे आहे.
अँडरसनला वाटते की, गोलंदाज म्हणून त्याच्याकडे क्रिकेटला देण्यासारखे बरेच काही शिल्लक आहे. गेल्या महिन्यात लॉर्ड्सवर शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर अँडरसन इंग्लंडच्या गोलंदाजांसोबत प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम करतोय. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतही तो त्याच भूमिकेत राहील. मात्र, या हिवाळी हंगामात तो पाकिस्तान आणि न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी परदेशातील लीग खेळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना तो म्हणाला, “मला वाटते की फ्रँचायझी क्रिकेटमध्ये करण्यासारखे काहीतरी बाकी आहे. मला अजून थोडे अधिक खेळायचे आहे. मला अद्याप माहित नाही की, फ्रेंचाइजी क्रिकेट काय आहे ? मी या क्षणी त्यासाठी उपलब्ध आहे.”
तो पुढे म्हणाला, “विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि मला फक्त बसून त्याबद्दल लोकांशी बोलण्याची गरज आहे. मी हंड्रेड पाहतो आणि पहिल्या 20 चेंडूंमध्ये चेंडू चांगला स्विंग होताना पाहतो. यानंतर मी विचार केला की, मी हे करू शकतो. मला माहित नाही की, ही निवड योग्य ठरेल की नाही. मात्र, मला असे काहीतरी करायचे आहे जे यापूर्वी केले नाही.”
अँडरसनने 2019 पासून मर्यादित षटकांचे कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही. त्याचा शेवटचा टी20 सामना 2014 मधील लँकेशायरसाठी नॅटवेस्ट ब्लास्ट फायनल होता. त्यानंतर त्याने पूर्णपणे आपले लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रित केले होते. मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 704 बळी जमा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
PAKvsBAN: पाकिस्तानात समोस्यांपेक्षा स्वस्त दरात मिळतायत कसोटीची तिकिटे, सोशल मीडियावर होतंय हसू!
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत
इशानकडे स्वत:हून चालून आली संधी, संघात पुनरागमन करताच गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ