मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत विक्रमांचे डोंगर रचले आहेत. या सामन्यात रविवारी(२७ डिसेंबर) दुसऱ्या दिवसाखेर भारताने ९१.३ षटकात २७७ धावा केल्या आहेत. याबरोबरच ८२ धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात प्रभारी कर्णधारपद सांभाळत असलेला अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत २०० चेंडूत १०४ धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत १२ चौकार मारले आहेत. हे रहाणेचे १२ वे कसोटी शतक आहे. त्याने ही १२ शतके भारतासह ६ वेगवेगळ्या देशांत केली आहे.
त्याने भारतात सर्वाधिक ४ शतके केली आहे. त्यापाठोपाठ त्याने ऑस्ट्रेलियामध्ये २ शतके केली आहेत. रविवारी केलेल्या शतकाआधी त्याने २०१४ मध्ये मेलबर्न येथेच १४७ धावांची शतकी खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियापाठोपाठ त्याने वेस्ट इंडिज म्हणजे कॅरेबियन बेटांवर २ शतके केली आहेत. ही शतके त्याने किंग्स्टन आणि नॉर्थ साऊंड येथील मैदानांवर केली आहे.
याशिवाय त्याने श्रीलंकेतील कोलंबो येथे २ शतके केली आहेत. तर इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये त्याने प्रत्येकी १ शतक केले आहे. इंग्लंडमध्ये त्याने लॉर्ड्सच्या मैदानात शतक केले आहे. तर न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन येथे त्याने शतकी खेळी केली आहे.
रहाणेने ही शतकी खेळी करताना हनुमा विहारीबरोबर (२१) ५२ धावांची आणि रिषभ पंतबरोबर (२९) ५७ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. तसेच रवींद्र जडेजाबरोबर १०४ धावांची नाबाद शतकी भागीदारी रचली आहे. त्याच्यासह दुसऱया दिवसाखेर जडेजा ४० धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! मेलबर्नच्या मैदानावर शतक करणारा रहाणे केवळ दुसराच भारतीय कर्णधार; पाहा पहिलं नाव कुणाचं
रहाणेची विक्रमी कामगिरी! ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत शतक ठोकत झाला गांगुली, सचिनच्या यादीत सामील
ही कसली भानगड! श्रीलंकन कॅप्टनच्या नावापुढे जोडलं गेलं क्विंटन डी कॉकचं आडनाव, जाणून घ्या प्रकरण