चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच आता मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. भारताच्या दुसऱ्या कसोटीतील विजयात फिरकीपटू अक्षर पटेलने मोलाचा वाटा उचलला होता. विशेष म्हणजे हा त्याचा पदार्पणाचा कसोटी सामना होता.
अक्षर पटेलने पदार्पण गाजवले…
अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यातून पदार्पण करताना पहिल्या डावात ४० धावांत २ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ६० धावांत ५ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे दोन्ही डावात त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटची महत्त्वाची विकेट घेत भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला.
पदापर्णात ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून अक्षर पटेलने पदार्पण केले असल्याने आणि या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्याने त्याचा पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो ९ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारताकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यात एका डावात ५ विकेट्स घेण्याचा सर्वात आधी मोहम्मद निसार यांनी कारनामा केला होता. त्यांनी १९३२ साली जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे असा कारनामा केला होता.
त्यांच्यानंतर वामन कुमार (१९६१), एस आबिद अली (१९६७), दिलीप दोषी (१९७९), नरेंद्र हिरवानी (१९८८), अमित मिश्रा (२००८), आर अश्विन (२०११) आणि मोहम्मद शमी (२०१३) यांनी पदार्पणाच्या कसोटीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला; आता यात अक्षर पटेलचाही समावेश झाला आहे.
या ९ गोलंदाजांमधील नरेंद्र हिरवाणी असे एकमेव भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावात ५ पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी १९८८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नई येथे दोन्ही डावात प्रत्येकी ८ विकेट्स घेतल्या होत्या.
अक्षरने वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये केले आहे भारताचे प्रतिनिधित्व –
अक्षरने २०१४ साली भारताकडून बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत ३८ वनडे सामने खेळले. यात त्याने ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो ११ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळला आहे. यात त्याने ९ विकेट्स घेतल्या आहेत. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केल्यानंतर त्याला कसोटीत पदार्पण करण्यासाठी ७ वर्षे वाट पाहावी लागली. पण अखेर त्याचे कसोटी पदार्पणाचे स्वप्नही पूर्ण झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याला जाऊ देणे गरजेचे होते”, रूटने सांगितले मोईन अलीला मायदेशी पाठवण्यामागचे खरे कारण
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय
नेटकरी जोमात, इंग्लंड कोमात! भारताच्या विजयानंतर चाहत्यांचा उत्साह, सोशल मिडीयावर मिम्सचा सुळसुळाट






