क्रिकेटमध्ये असे म्हटले जायचे की, २००० सालच्या सुरुवातीला फलंदाज आणि फिरकीपटू गोलंदाज मिळून विकेट्स घ्यायचे. जर आपल्याला पाहायचे झाले, तर कसोटी सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज राहुल द्रविडने आपल्या २१० झेलांमधील ५५ झेल अनिल कुंबळेच्या लेग स्पिनवर घेतले होते. यांच्याआधी श्रीलंकाचा फलंदाज महेला जयवर्धने आणि मुथय्या मुरलीधरन यांची नाव यात आहेत. यात मुरलीधरनच्या गोलंदाजीवर जयवर्धनेने तब्बल ७७ झेल घेतले होते.
द्रविड आणि कुंबळे यांच्या जोडीने त्यांच्या निवृत्तीनंतर देखील क्रिकेटमधील आपली चमक दाखवली. द्रविड भारताच्या कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक झाला, तर अनिल कुंबळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. द्रविडच्या प्रशिक्षणात भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धेवर आपले नाव कोरले होते. तर अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणात भारताच्या वरिष्ठ संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. या दोनही खेळाडूंच्या अनुभवाचा भारतीय संघाला चांगलाच फायदा झाला. तसेच द्रविड-कुंबळे यांच्या मार्गदर्शनात अनेक युवा खेळाडूंचा खेळण्यातला स्तरही उंचावला.
तर आज आपण त्याच खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्या खेळातील स्तर सुधारण्यात कुंबळे-द्रविड यांच्या जोडीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
हार्दिक पांड्या –
अनिल कुंबळेच्याच वेळीच हार्दिक पांड्या भारतीय संघात सामील झाला होता. भारतीय संघाला खूप काळापासून एका अशा अष्टपैलू खेळाडूची गरज होती, जो वेगवान गोलंदाजीसहित फलंदाजीतदेखील उल्लेखनीय कामगिरी करेल. भारतीय संघाला हार्दिक पांड्याच्या रूपात असा एक अष्टपैलू खेळाडू मिळाला.
पांड्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपल्या खेळाच्या कौशल्यावर अनेक क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधले होते. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार्या पांड्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या खासकरून क्षेत्ररक्षणाच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले होते. याच कारणामुळे कुंबळे ज्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले, तेव्हा त्यांनी हार्दिक पांड्याला एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात सामील केले होते.
पांड्याच्या यशस्वी खेळाचे श्रेय कुंबळे आणि द्रविड यांच्या मार्गदर्शनाला जाते. याबाबत पांड्या स्वतः कबुल करत म्हणाला होता की, “जेव्हा मी भारताच्या अ संघासोबत ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलो होतो, तेव्हा मी मानसिकरीत्या खूप मजबूत झालो होतो.” याचे संपूर्ण श्रेय त्याने संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले होते. त्याचसोबत राहुल द्रविड यांनी त्याला मानसिकरित्या मजबूत बनवले ज्यामुळे त्याने त्या दौर्यात त्याची उत्कृष्ट खेळी केली होती.
मनिष पांडे –
मनीष पांडे याने आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) कडून खेळताना अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यावेळी राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे दोघेही आरसीबी संघाकडून खेळत होते. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी मनीष पांडेला खूप प्रोत्साहित केले होते.
द्रविड आणि कुंबळे दोघेही कर्नाटकचे आहेत. तसेच मनीष पांडेदेखील कर्नाटकचा खेळाडू आहे. त्यामुळे मनीष पांडेने नेहमीच या २ दिग्गज खेळाडूंना आपले आदर्श मानले होते. द्रविडच्या मार्गदर्शनात मनीष पांडेच्या खेळात खूप सुधार झाला होता. पांडे ज्यावेळी भारताच्या अ संघाचा कर्णधार होता, तेव्हा राहुल द्रविड त्या संघाचा प्रशिक्षक होता. यानंतर पांडेला भारताच्या वरिष्ठ संघात देखील स्थान देण्यात आले होते. त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले अनिल कुंबळेचे देखील त्याला मार्गदर्शन लाभले.
कुंबळे पांडेला नेहमी मदत करायचा. त्याला फलंदाजीसाठी देखील वरच्या क्रमांकावर म्हणजेच चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. तेव्हा पांडेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कठीण परिस्थितीत देखील दमदार शतक लगावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी पांडेच्या या खेळाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.
करून नायर –
करून नायर हादेखील मूळचा कर्नाटकचा खेळाडू आहे. नायरच्या रूपात एक अत्यंत उत्कृष्ट खेळाडू कर्नाटकला मिळाला होता. नायरच्या उत्कृष्ट खेळीमध्ये देखील द्रविड आणि कुंबळे यांचे खूप मोठे योगदान होते. २०१६ साली आयपीएलमध्ये करून नायर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी राहुल द्रविड दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मार्गदर्शक होता. ज्यामुळे नायरला खूप फायदा झाला.
तसेच भारताच्या संघात नायरने राहुल द्रविडकडून खूप सार्या गोष्टी शिकल्या. कनिष्ठ संघात नायरकडे राहुल द्रविडसारखा प्रशिक्षक होता, तर वरिष्ठ संघात त्याला अनिल कुंबळेचे मार्गदर्शन लाभले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन सामन्यातील असमाधानकारक खेळीनंतरही कुंबळेने नायरला संघात कायम ठेवले होते. परिणामी स्वरूप नायरने त्या मालिकेत सामन्यातील एका डावात ३०० धावा ठोकल्या होत्या. तेव्हा नायरच्या त्या खेळीचे सर्वत्र कौतुक केले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताला सर्वाधिकवेळा धोबीपछाड देणारे ‘हे’ आहेत संघ
–यष्टीमागे अन् यष्टीपुढेही यांचा धाक! क्रिकेटविश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारे ४ विकेटकीपर
–‘पोलार्ड अनस्टॉपेबल’! ताबडतोब खेळीसह टी२०त रचला इतिहास, गाठला ‘इतक्या’ हजार धावांचा पल्ला