वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. रविचंद्रन अश्विन याचे विजयासाठीचे योगदान महत्वाचे राहिले. अश्विनने पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत विरोधी संघाला स्वस्तात बाद केले. परिणामी भारतीय संघासाठी विजय खूपच सोपा झाला. त्याव्यतिरिक्त रविंद्र जडेजाचे प्रदर्शनही चांगले होते. असे असले तरी, भारताचे माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिक कुंबळे यांनी एक मोलाचा सल्ला कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला दिला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 150, तर दुसऱ्या डावात 130 धावांवर गुंडाळले. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची चांगली साथ मिळाली. जडेजाने पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. भारताची ही फिरकीपटू जोडी चांगली कामगिरी करत असताना संघात सध्या तरी कुठल्या फिरकीपटूची गरज भारत नाही. मात्र, अनिल कुंबळे यांच्या मते कुलदीप यादव (Kuldeep Yadav) पुन्हा भारतासाठी खेळला पाहिजे. कुलदीपने आपला शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला निवडले गेले, पण खेळण्याची संधी मिळाली नाही. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी मात्र तो संघात स्थान मिळवू शकला नाही.
याच पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेंनी कुलदीप भारतासाठी खेळला पाहिजे, असे सांगितले. कुंबळे म्हणाले, “कुलदीप यादव नक्कीच कसोटी संघात पाहिजे. कारण तो चांगलागोलंदाज आहे. लेग स्पिनर खूप आक्रमक गोलंदाज असतो. अनेकदा ही गोष्ट संघासाठी अडचणीचीही ठरते, पण एक लेग स्पिनर तुम्हा सोबत ठेवला पाहिजे आणि त्याला तयार केले पाहिजे. अशात जेव्हा कधी त्याला संधी मिळेल, तेव्हा त्याला संधी दिली पाहिजे. कसोटी सामन्यात तो एक चांगला पर्याय आहे. जेव्हा कधी त्याला संधी मिळाली आहे, त्याने चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अनेक फिरकीपटू आहेत. पण कसोटीत आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत.”
भारतीय संघासाठी सध्या रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा चांगले प्रदर्शन करत आहेत. अक्षर पटेल (Axar Patel) देखील एक चांगला अष्टपैलू पर्याय संघाकडे आहे. मात्र, कुंबळेंच्या मते हे तीन खेळाडू असतानाही शक्य असेल तिथे कुलदीपला खेळण्याची संधी दिली पाहिजे. “अश्विन आणि जडेजा सध्या भारतीय संघासाठी खूप चांगले काम करत आहेत. दोघेही दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. तिसरा फिरकीपटू अक्षर पटेल आहे. त्याला जेव्हा कधी संधी मिळाली, तेव्हा चांगले प्रदर्शन केले आहे. कुलदीपलाही त्यांच्यासोबत संघात ठेवले पाहिजे. जेव्हा शक्य असेल, तेव्हा खेळवलेही पाहिजे,” असे कुंबळे म्हणाले. (Anil Kumble’s request to include Kuldeep Yadav in the team)
मबत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा कर्णधार बनताच आली ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “गळ्यात सुवर्णपदक घालून…”
शिखरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द समाप्त! एशियन गेम्ससाठी संघात स्थान नाही, चाहते म्हणतायेत…