मगंळवारी (30 ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तान आणि बांगलादेश आमने सामने आले होते. आशिया चषकातील पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. अफगाणिस्तानने या सामन्यात यजमान श्रीलंकन संघाला 8 विकेट्स राखून पराभूत केले होते, पण त्यांचा दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खान या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नव्हता. मात्र, बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात खेळताना त्याने चमकदा कामगिरी केली आणि स्वतःच्या नावापुढे मोठ्या विक्रमाची नोंद देखील केली.
राशिद खान (Rashid Khan) आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळताना राशिदने 4 षटकांमध्ये 22 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. याचसोबत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विकेट्सची संख्या 115 झाली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी (Tim Southee) आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे, ज्याच्या नावावर 95 टी-२० सामन्यांमध्ये 114 विकेट्सची नोंद आहे.
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिबने आतापर्यंत 100 टी-20 सामने खेळले आणि यामध्ये 122 विकेट्स मिळवल्या आहेत. शाकिब जरी या यादीत पहिल्या क्रमांकावर असला, तरी राशिद खानचे प्रदर्शन त्याच्यापेक्षा अधिक चांगले असल्याचे दिसते. कारण राशिदने अवघ्या 68 टी-20 सामन्यांमध्ये ही कांमगिरी केली आहे. जेव्हा राशिद 100 टी-20 सामने खेळेल, तेव्हा नक्कीच त्याच्या विकेट्सची संख्या ही शाकिबच्या तुलनेत जास्त असू शकते.
दरम्यान, श्रीलंका संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) देखील या यादीत सहभागी आहे, ज्याने 100 पेक्षा जास्त टी-20 विकेट्स घेतल्या आहेत. तो अशी कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला होता. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 84 टी-20 सामन्यांमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हाँगकाँगचा बाबर’ भारतासाठी ठरणार कर्दनकाळ! नावावर आहे मोठा विक्रम, रोहितही नाही आसपास
‘…आम्हीही चांगलीच टक्कर देऊ शकतो’, भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी हाँगकाँगच्या कर्णधाराची हुंकार
Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली