विश्वचषक 2023 स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर तीन दिवसांनी लगेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला गेला. अशात आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मायकल हसी याने मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले की, विश्वचषकानंतर लगेच भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेचे आयोजन केल्यामुळे याचे महत्त्व कमी झाले.
काय म्हणाला हसी?
बुधवारी (दि. 29 नोव्हेंबर) मायकल हसी (Michael Hussey) याने सेन रेडिओशी बोलताना म्हटले की, “माझा विश्वास आहे की, या टी20 मालिकेचे महत्त्व कमी केले आहे. यामुळे विश्वचषकाचे महत्त्व कमी झाले नाहीये, पण निश्चितरीत्या या मालिकेचे महत्त्व विश्वचषकामुळे कमी झाले.” ऑस्ट्रेलियाचे 6 खेळाडू गुवाहाटीतील तिसऱ्या टी20 सामन्यानंतर मायदेशी परतत आहेत. त्यामुळे हसीला वाटते की, भारताविरुद्ध उतरणारा त्यांचा सर्वोत्तम संघ नाहीये.
तो म्हणाला, “अनेक असे खेळाडू आहेत, जे विश्वचषक संघात सामील होते. त्यांनी टी20 संघातही सामील व्हायला पाहिजे होते. ते एक तर कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी मायदेशी परतले आहेत. हा निश्चितच ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम संघ नाहीये, जो भारताच्या सर्वोत्तम टी20 संघाचा सामना करत आहे.”
हसीने वर्तमानात जास्त क्रिकेट खेळण्यावरही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “हे आश्चर्यजनक आहे की, इतक्या जास्त प्रमाणात क्रिकेट खेळले जात आहे. जेवढ्याही स्पर्धा खेळल्या जात आहेत, त्यामध्ये खेळणे शारीरिक आणि मानसिकरीत्या अशक्य आहे.”
हसी असेही म्हणाला की, विश्वचषकातील शानदार यश पाहून आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात अधिक वनडे सामन्यांना जाग मिळाली पाहिजे. तो म्हणाला, “असे होऊ शकते की, खूप कमी लोक मला पाठिंबा देतील, पण माझा विश्वास आहे की, वनडे क्रिकेट शानदार क्रिकेट प्रकार आहे. विश्वचषक याचे शानदार उदाहरण आहे, ज्यात अविश्वसनीय क्रिकेट खेळले गेले.”
चालू मालिकेचा आढावा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. तसेच, तिसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. अशात आता तीन सामन्यांनंतर भारतीय संघ 2-1ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना 1 डिसेंबर रोजी रायपूर येथे खेळला जाईल. (australian former cricketer michael hussey on india australia t20 series said this know here)
हेही वाचा-
‘रोहितच्या जागी मी कर्णधार असतो, तर 100 वेळा…’, WC Finalमध्ये संघात जागा न मिळण्याबद्दल अश्विनचे भाष्य
IPL 2024मधून बाहेर पडलेल्या ‘या’ खेळाडूच्या गुडघ्याची सर्जरी, फोटो पाहिला का?