पुणे। एच पी रॉयल्स संघाने जनादेश संघाला पराभूत करताना आझम महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत एच पी रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना मुक्ता मगरेच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ४ बाद १५५ धावा केल्या. मुक्ता मगरेने ५७ चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने ७१ धावांची खेळी केली. तिला पूनम खेमनारने ३२ चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने ३७ धावा करताना सुरेख साथ दिली. सायली लोणकरने १४ (१ चौकार) तर विनवी गौरवने १३ (२ चौकार) धावांची खेळी केली. इशा पठारे, प्रियांका कुंभार, कश्मीरा शिंदे, तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
जनादेश संघाला १९.४ षटकांत सर्वबाद ११४ धावाच करता आल्या. सलामीवीर तेजल हसबनीसने ३६ चेंडूत ६ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ५१ धावांची खेळी केली. तिला श्री राठोडने २३ (३ चौकार), तर आरती सुनीलने १३ धावांची खेळी केली. पूनम खेमनारने भेदक गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. गौतमी नाईकने २ तर अभिलाशा पाटील व शाल्मली क्षत्रिय यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अंतिम लढतीत मुक्ता मगरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एम सी सोच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलझार शेख उपस्थित होते.
स्पर्धेत २५४ धावा करणाऱ्या एच पी रॉयल्सच्या मुक्ता मगरेला सर्वोत्तम फलंदाज, ८ गडी बाद करणाऱ्या पीएमपी संघाच्या प्रिया कोकरेला सर्वोत्तम गोलंदाज तर ३ बळी व १८२ धावा करणाऱ्या आझम स्पोर्ट्स अकादमीच्या किरण नवगिरेला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
एच पी रॉयल्स : २० षटकांत ४ बाद १५५ ( मुक्ता मगरे ७१ (५७ चेंडू, ८ चौकार), पूनम खेमानार ३७ (३२ चेंडू, ५ चौकार), सायली लोणकर १४ (१ चौकार), विनवी गौरवने १३ (२ चौकार), इशा पठारे ४.०.२७.१, प्रियांका कुंभार ४.०.३०.१, कश्मिरा शिंदे ४.०.३०.१, तेजल हसबनीस ४.०.२६.१) वि वि जनादेश १९.४ षटकांत सर्वबाद ११४ (तेजल हसबनीस ५१ (३६ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), श्री राठोड २३ (३ चौकार), आरती सुनील १३ (२ चौकार), पूनम खेमनार ४.०.२२.४, गौतमी नाईक १.४.०.७.२, अभिलाशा पाटील ३.०.१५.१, शाल्मली क्षत्रिय २.०.९.१)
महत्त्वाच्या बातम्या –
“तेव्हा धोनी पाठीवर थाप मारत म्हणालेला आजचा दिवस तुझा नव्हता”
दुसरी टी२०: नाणेफेक जिंकून पोलार्डचा गोलंदाजीचा निर्णय, वेस्ट इंडिज संघात खतरनाक अष्टपैलूचे पुनरागमन
टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डही करणार शतक? कसं ते घ्या जाणून