क्रिकेटचा कोणताही प्रकार पाहिला तरी द्विशतक करणे तसे अवघडच. कसोटीमध्ये आत्तापर्यंत १९४ वेळा २०० पेक्षा अधिक धावा फलंदाजांना करता आल्या आहेत. तर वनडेत ८ वेळा खेळाडूंनी २०० धावांचा टप्पा पार केला आहे. यात एकट्या रोहित शर्माने ३वेळा हा कारनामा केला आहे. यातील केवळ ४ खेळाडूंनाच कसोटी आणि वनडे या दोन्ही प्रकारात द्विशतक करता आले आहे. त्या ४ खेळाडूंचा घेतलेला आढावा –
वनडे आणि कसोटीमध्ये द्विशतक करणारे क्रिकेटपटू –
रोहित शर्मा –
रोहित शर्मा हा सध्याच्या काळातील एक स्पोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने नुकतेच काही दिवसांपूर्वी रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना कसोटीतील पहिले द्विशतक केले. त्याने त्या सामन्यात २१२ धावांची खेळी केली.
त्याआधी रोहितने वनडेमध्ये २ नोव्हेंबर २०१३ ला बंगळुरूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदा २०९ धावांची द्विशतकी खेळी केली होती. तर वनडेतील सर्वोच्च २६४ धावांचा विश्वविक्रम त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर श्रीलंका विरुद्धच १४ नोव्हेंबर २०१४ ला केला होता. त्यानंतर त्याने डिसेंबर २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे २०८ धावांची खेळी केली. वनडेत तीन द्विशतके करणारा रोहित पहिला क्रिकेटपटू आहे.
ख्रिस गेल –
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेेलने आत्तापर्यंत अनेक तुफानी खेळी केल्या आहेत. तो कसोटीत पहिल्या चेंडूवर षटकार मारणाराही पहिला खेळाडू आहे. त्याने कसोटीमध्ये ३ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यात त्याने २ वेळा त्रिशतकी खेळी केली आहे. तर १ द्विशतकी खेळी आहे.
त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१० ला केलेली ३३३ धावांची खेळी त्याची कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. गेलने कसोटीबरोबरच २०१५ च्या वनडे विश्वचषकात १ द्विशतक केले. त्याने कॅनबेरा येथे २०१५ ला झिम्बाब्वे विरुद्ध विश्वचषकाचा सामना खेळताना १४७ चेंडूत २१५ धावा करत वनडेतील त्याचे पहिले द्विशतक केले होते.
विरेंद्र सेहवाग –
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या स्पोटक खेळींसाठी ओळखला गेला आहे. त्याने कसोटीमध्ये ६ वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. यामध्ये त्याने २ त्रिशतके केली आहेत. कसोटीत २ त्रिशतके करणारा तो भारताचा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. तर ४ द्विशतके त्याने केली आहेत.
त्याने मार्च २००८ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली ३१९ धावांची खेळी कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावांची वैयक्तिक खेळी आहे. याशिवाय त्याने २०१२ ला इंदोर येथे पार पडलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात २१९ धावांची द्विशतकी खेळी केली आहे. त्यावेळी तो कसोटी आणि वनडेमध्ये द्विशतके करणारा दुसरा फलंदाज ठरला होता.
सचिन तेंडुलकर –
कसोटी आणि वनडेमध्ये द्विशतके करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिळवला आहे. त्याने कसोटीमध्ये ६ वेळा द्विशतकी खेळी केल्या आहेत. नाबाद २४८ धावा या त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावांची खेळी आहे. ही खेळी त्याने २००४ ला बांगलादेश विरुद्ध ढाका येथे खेळताना केली होती.
त्यानंतर सचिनने २४ फेब्रुवारी २०१० ला पुरुषांच्या वनडेमध्ये पहिलेच द्विशतक करण्याचा इतिहास रचला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेर येथे झालेल्या वनडे सामन्यात १४७ चेंडूत २५ चौकार आणि ३ षटकार मारत नाबाद २०० धावा केल्या होत्या. त्यावेळी तो कसोटी आणि वनडेमध्ये द्विशतके करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेट जगतात दु:खाचे वातावरण, महान क्रिकेटपटूचा झोपेतच मृत्यु
कोरोनामुळे कोणत्याच बोर्डाला न जमलेलं काम बीसीसीआयने केलं, क्रिकेटपटूही झाले खूश
नेहमी टक्कल ठेवणाऱ्या गब्बर शिखर धवनने सांगितला या पाठीमागचा राज