अहदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची संधी देण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनने पुढील ३ सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात यावे असा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी आयपीएल स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियम मध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशातच ९ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अरुण धुमाळ यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, “आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळणार नाही. परंतु पुढील सामन्यांमध्ये, प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळू शकते असा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवला आहे.”
यापूर्वी बीसीसीआयने आयपीएलचे सामने बंद दाराआड खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावर पुनर्विचार करण्याचे बीसीसीआयने ठरवले होते. याबाबत अरुण धुमाळ यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की या सगळ्या गोष्टी परिस्थितीवर निर्भर करतील.
आयपीएल स्पर्धेला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सहा शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. यात मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळूरु, चेन्नई आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या हंगामात प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळेल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
सूर्यकुमार यादवला वगळण्याच्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला, संधी न देताच
या ५ भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने गमावला तिसरा टी२० सामना
बीसीसीआयचा मोठा निर्णय, ही देशांतर्गत स्पर्धा पुन्हा एकदा करण्यात आली स्थगित