भारतीय क्रिकेट संघ नुकताच यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. आता भारताला इंग्लंड संघाशी मायदेशात दोन हात करायचे आहेत. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील ५ फेब्रुवारीपासून सुरु होणारी कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.
सध्या भारत दौऱ्यातील पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी निवड झालेल्या इंग्लंड संघातील काही खेळाडू श्रीलंकेत असून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. त्यामुळे हे खेळाडू २६ जानेवारीनंतर श्रीलंकेतून भारतात येतील. तर काही खेळाडू इंग्लंडमधून भारतात येणार आहे. यात बेन स्टोक्स या अष्टपैलू क्रिकेटपटूचाही समावेश आहे.
स्टोक्सला जोफ्रा आर्चरसह श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती दिली होती. तसेच सलामीवीर रॉरी बर्न्स देखील त्याच्या पहिल्या अपात्यच्या जन्मामुळे मायदेशी होता. त्यामुळे हे तिघेही आता लवकरच भारतात येतील.
याबाबत स्टोक्सने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात तो विमानात बसलेला फोटो त्याने शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की ‘सी यू सून इंडिया'(लवकरच भारतात येत आहे). स्टोक्सचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
See you soon India ✈️???????? pic.twitter.com/TrGHG3iuy3
— Ben Stokes (@benstokes38) January 23, 2021
भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी आर्चर, स्टोक्स आणि बर्न्स या तिघांचेही इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. तर इंग्लंडने श्रीलंका दौऱ्यात खेळलेल्या सॅम करन आणि जॉनी बेअरस्टोला विश्रांती दिली आहे.
तसेच भारतीय संघाचीही बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी घोषणा केली आहे. भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांचे पुनरागमन झाले आहे. तर अक्षर पटेल या अष्टपैलू फिरकी गोलंदाजाला संघात संधी मिळाली आहे. मात्र रविंद्र जडेजा या कसोटी मालिकेला दुखापतीमुळे मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सध्या हा इंग्लंडचा दौरा कोरोनाच्या संकटामुळे तीन ठिकाणीच होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचे पहिले २ सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ कसोटी सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर अहमदाबाद येथेच ५ टी२० सामने होतील. त्यानंतर पुण्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदिप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.
पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन स्टोक्स, टेन लॉरेंस, जॅक लीच, डॉम सिब्ले, बेन फोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडकडून ७४५ खेळाडू खेळले पण ‘असा’ विक्रम करणारा जो रुट दुसराच क्रिकेटपटू
चाहत्यांसाठी गुडन्यूज! भारतातील ‘या’ टी२० मालिकेसाठी मिळू शकते स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री





