भारतीय क्रिकेटजगतात आतापर्यंत एकाहून एक सरस शिलेदार होऊ गेले आहेत. परंतु प्रत्येकालाच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा डंका पिटता आला नाही. अनेकांनी त्यांच्या प्रदर्शनात निरंतरता राखत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने आपले नाव कोरले. तर अनेकांमध्ये प्रतिभा असूनही त्यांना पुरेशी संधी मिळाली नाही. 70 च्या दशकात असेच एक भारतीय क्रिकेटपटू होऊन गेले, जे माजी भारतीय सलामीवीर सुनिल गावसकर यांचा सलामी जोडीदार बनण्याचे प्रबळ दावेदार होते. परंतु अवघ्या एका सामन्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर अंकुश लागला. ते कमनशिबी क्रिकेटपटू म्हणजे, गोपाल बोस.
याच दिवंगत भारतीय दिग्गज गोपाल बोस यांची आज (20 मे) 74 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, त्यांच्या कारकिर्दीतील काही रोमांचक बाबी.
-कोलकाता येथे जन्माला येणारे गोपाल बोस हे कोलकाता विद्यापिठात नोकरी करत होते. तेथूनच त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी बिहार विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी बंगाल संघाकडून 3 डाव खेळताना त्यांची फलंदाजी कामगिरी उल्लेखनीय झाली नव्हती. मात्र, त्यांनी त्याच डावात उत्तम गोलंदाजी करत 14 विकेट्स घेतल्या होत्या.
-पुढे त्यांनी कारकिर्दीत एकूण 78 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यातील जास्तीत जास्त सामने त्यांनी बंगालकडून खेळले. यावेळी सुरुवातीला चांगले फलंदाजी प्रदर्शन न करू शकणारे बोस पुढे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बनले. त्यांनी प्रथम श्रेणीत 30.79च्या सरासरीने 3757 धावा केल्या होत्या. तर, 26.97च्या सरासरीने 72 विकेट्स घेतल्या होत्या.
-बोस यांनी 1973-74मध्ये इराणी ट्रॉफीत बॉम्बे संघाविरुद्ध खेळताना उल्लेखनीय 170 धावांची खेळी केली होती. हा पराक्रम त्यांनी शेष भारतीय संघाकडून खेळताना नोंदवला होता. त्यांच्या या कामगिरीने त्यांची राष्ट्रीय संघात निवड होण्याच्या संधीची दारे खुली झाली होती. या सामन्यात बॉम्बे संघाकडून खेळताना गुंडप्पा विश्वनाथ आणि ब्रिजेश पटेल यांनी मिळून अर्धशतक केल्याने हा सामना अनिर्णीत राहिला होता.
-यानंतर बऱ्याच वर्षांनी बोस यांनी एबीपीच्या गौतम भट्टाचार्य यांना सांगितले होते की, त्यांना दारूचे आणि पत्ते खेळण्याचे व्यसन होते.
-तसेच भट्टाचार्य यांना त्यांनी एक किस्साही सांगितला होता. तो असा की, इराणी ट्रॉफीचा सामना खेळल्यानंतर जेव्हा त्यांचा संघ ट्रेनने अहमदाबादवरून बॉम्बेला चालला होता. तेव्हा त्यांचा पतौडी (इफ्तिखार अली खान) यांच्याशी सिगारेटवरून वाद झाला होता. परंतु नंतर बोस यांना त्यांच्या वागणुकीचे खूप वाईट वाटले होते.
-एवढेच नव्हे तर बोस यांनी कोलम्बो ओव्हल स्टेडियवरील अनधिकृत कसोटी सामन्यात शतक करत सुनील गावकसकरांसोबत 194 धावांची भागीदारी केली होती. यावेळी त्यांनी एकूण 104 धावा केल्या होत्या.
-या अनधिकृत कसोटी सामन्यातील बोस यांच्या शतकी पराक्रमामुळे त्यांना इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, पदार्पणाच्या वनडे सामन्यात त्यांनी अवघ्या 13 धावा केल्या होत्या. असे असले तरी, यावेळी फलंदाजीत न चमकू शकलेले बोस यांनी 11 षटके गोलंदाजी करताना इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड एललॉयड्स (David Lloyd’s) यांची 39 धावांवर महत्त्वाची विकेट घेतली होती.
मात्र पुढे एकाही वनडेत त्यांना भारतीय संघात प्रवेश न मिळाल्याने इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांचा पहिला आणि शेवटचा वनडे सामना ठरला.
-2008 साली भारताला 19 वर्षांखालील विश्वचषकात विजेतेपद मिळवून देण्यात बोस यांचे मोठे योगदान होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्या संघाचा कर्णधार विराट कोहली होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये एकाच षटकात ५ खणखणीत षटकार ठोकत प्रकाशझोतात आलेला ‘राहुल तेवतिया’
क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! ‘ही’ मानाची स्पर्धा झाली रद्द, जून महिन्यात होणार होते आयोजन
त्या दिवशी धोनी पुढे आला नसता तर श्रीशांतमुळे चांगलाच राडा झाला असता!