कॅरेबियन बेटांवरील कोणत्याही खेळाचे खेळाडू म्हटलं की, समोर येतात ते उंचेपुरे, धिप्पाड शरीरयष्टीचे, चेहऱ्यावर निर्विकार भाव घेऊन मैदानात उतरणारे, मात्र त्यानंतर अगदी खेळकर वातावरणात, प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करणारे खेळाडू. याच कॅरेबियन बेटांवरील देशांचा मिळून, वेस्ट इंडीज नावाचा एकच संघ क्रिकेट खेळतो. इतर खेळांप्रमाणेच कॅरेबियन बेटांवरील हा संघ आपल्या अनोख्या आक्रमक शैलीने क्रिकेट खेळताना दिसून येतो. वेस्ट इंडीज क्रिकेटने ज्याप्रकारे सुरुवातीला क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याच प्रकारे ते आजतागायत क्रिकेट खेळत आले आहेत. यशापयशाची चिंता न करता ते फक्त क्रिकेटचा आनंद लुटतात.
वेस्ट इंडीजच्या संघाने 70 व 80च्या दशकात क्रिकेट जगतावर अक्षरशः राज्य केले होते. वेगवान गोलंदाजांची चौकडी, जोडीला एक-दोन उत्तम फिरकीपटू आणि जगातील सर्वात आक्रमक फलंदाज असे या संघाचे समीकरण असायचे. याच वेस्टइंडीज संघाने 1975 आणि 1979 चे क्रिकेट विश्वचषक जिंकले. तर 1983 विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. वेस्ट इंडीज क्रिकेटच्या या सुवर्णकाळात एक खेळाडू असे होते, जे खऱ्या अर्थाने वेस्ट इंडीज व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे ‘ब्रँड अँबेसिडर’ होते. आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारे हे खेळाडू होते, ‘सर विवीयन रिचर्डस’.
याच सर विवीयन रिचर्ड्स यांचा आज (07 मार्च) 70वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एका अद्वितीय खेळीची आठवण आपण ताजी करूया.
पहिले तीन विश्वचषक सलगपणे इंग्लंडमध्ये खेळवले गेले. 1987 मध्ये विश्वचषकाची चौथी आवृत्ती भारतीय उपखंडातील भारत व पाकिस्तान देशांमध्ये खेळवली जात होती. स्पर्धेतील सातवा सामना गतउपविजेते वेस्ट इंडीज व उपखंडातीलच श्रीलंका यांच्यात १३ ऑक्टोबर या दिवशी, कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार होता. ब गटात समाविष्ट असलेल्या या दोन्ही संघांनी, आपले सलामीचे सामने गमावले होते. स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी, उभय संघांना विजय आवश्यक होता. श्रीलंकेचे कर्णधार दुलीप मेंडीस यांनी नाणेफेक जिंकत, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कार्लीस्ले बेस्ट व डेसमंड हेन्स ही सलामी जोडी वेस्ट इंडीजसाठी मैदानात उतरली. दोन्ही सलामीवीरांनी वेस्ट इंडीजला आश्वासक सुरुवात देत, मोठी धावसंख्या उभारण्याची पायाभरणी सुरू केली. अशातच, श्रीलंकेचे मध्यमगती गोलंदाज रवी रत्ननायके यांनी बेस्ट यांची दांडी गुल केली. बेस्ट यांच्या जागी आलेल्या, भरवशाच्या रिची रिचर्डसन यांनी पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक कुरूप्पु यांच्या हाती झेल देत, तंबूचा रस्ता धरला. रत्नानायके हॅट्रिकवर होते. रिचर्डसन बाद झाल्यानंतर, त्यांची जागा भरून काढण्यासाठी, वेस्ट इंडिजचे कर्णधार विवियन रिचर्ड्स मैदानात उतरले. रिचर्ड्स मैदानात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर आत्मविश्वास दिसत होता. रत्ननायके यांच्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी जोरदार कव्हर ड्राईव्ह मारला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे त्या चेंडूवर रिचर्ड्स यांना दोनच धावा मिळाल्या. मात्र, यानंतर कराचीच्या या मैदानावर काहीतरी ऐतिहासिक घडणार आहे, याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती.
रिचर्ड्स यांनी चांगल्या चेंडूना सन्मान देत, तसेच खराब चेंडूंवर प्रहार करत धावा जमवायला सुरुवात केली. पायांवर पडलेल्या चेंडूंना दिशा दाखवून, त्यावर धावा मिळवायला ते कमी पडत नव्हते. पॉईंट व कव्हर्समधून त्यांनी काही अप्रतिम चौकार मारले. लेग साईडला एक धाव घेत त्यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता, हे अर्धशतक आले होते. अभिवादन स्वीकारण्यासाठी त्यांनी हलकीशी बॅट उंचावली व पुढील खेळासाठी ते सज्ज झाले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर जणू त्यांना आक्रमक फटके खेळायचा परवानाच मिळाला होता. लॉन्ग-ऑनला सहजरीत्या षटकार ठोकत, रिचर्ड्स हळूहळू आपला खरा अवतार दाखवू लागले. चपळतेने एक-दोन धावा घेत, तसेच हात खोलण्याची संधी मिळाल्यास, चौकार वसूल करत त्यांनी शतकाची वेस ओलांडली. रिचर्ड्स यांचे शतक पूर्ण झाले असले तरी, खरा खेळ यानंतर सुरू होणार होता.
दोन बाद 45 या धावसंख्येवरून जमलेली रिचर्ड्स-हेन्स ही अनुभवी जोडी, वेस्ट इंडीजला अडीचशे धावांकडे घेऊन चालली होती. या दरम्यान हेन्स यांनी देखील वैयक्तिक शतक पूर्ण केलेले. वेस्ट इंडीजची धावसंख्या 227 झाली असता, कामचलाऊ गोलंदाज असंका गुरूसिम्हा यांनी हेन्स यांना त्रिफळाचीत केले. हेन्स 124 चेंडूत 105 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून बाद झाले. डावाच्या 44 व्या षटकापासून रिचर्ड्स यांनी गोलंदाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्यावेळी वेस्ट इंडीजने 250 धावांचा टप्पा पार केला होता आणि त्यांची नजर 300 धावांच्या पुढील टप्प्यावर होती. मात्र, रिचर्ड्स यांच्या डोक्यात वेगळेच काहीतरी चालले होते. असंता डिमेल यांना एक्स्ट्रा कव्हरवरून दोन षटकार ठोकत, त्यांनी आपले मनसुबे जाहीर केले.
पुढील षटकातसुद्धा, गोलंदाजाच्या डोक्यावरून दोन सणसणीत चौकार मारत, त्यांनी आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. लॉन्ग-ऑफला दोन गगनचुंबी षटकार लगावत, त्यांनी चेंडू प्रेक्षकांत पाठवले. तिसरा षटकार मारत यांनी आपले दीडशतक पूर्ण केले. फक्त षटकारच न मारता, अप्रतिम मैदानी फटक्यांनी क्षेत्ररक्षकांना ते पळवत देखील होते. वेस्ट इंडीजचा धावफलक तीनशेच्या पलीकडे गेला होता. श्रीलंकेचे गोलंदाज हतबल दिसू लागले.
श्रीलंकन गोलंदाजांचे इतके मानसिक खच्चीकरण झाले होते की, ते रिचर्ड्स यांना फुलटॉस व हाफ-वॉली चेंडू टाकू लागले. सर्व श्रीलंकन गोलंदाजांची लय बिघडली होती. 49 व्या षटकात, जेव्हा रिचर्ड्स बाद झाले तेव्हा, त्यांच्या नावापुढे 181 धावा लागल्या होत्या. ही विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. रिचर्ड्स यांनी 125 चेंडूत 16 चौकार व 7 उत्तुंग षटकारांच्या साह्याने या १८१ धावा ठोकल्या होत्या. रिचर्ड्स स्वतःचा 189 धावांचा विक्रम मोडू शकले नव्हते, मात्र आपले दहावे एकदिवसीय शतक त्यांनी पूर्ण केले होते. रिचर्ड्स यांच्या आक्रमक व हेन्स यांच्या संयमी शतकांमुळे वेस्ट इंडीजने चार गड्यांच्या मोबदल्यात 360 धावांचा ‘एवरेस्ट’ उभा केला होता.
श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांसाठी, तो दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. डी मेल यांच्या 10 षटकात तब्बल 97 धावा लुटल्या गेल्या होत्या. तर, गुरूसिम्हा यांनी एक बळी मिळवत चार षटकात 43 धावांची खैरात वाटली. वेस्ट इंडीजने दिलेल्या 360 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दमछाक झाली. वेस्ट इंडीजच्या अनुभवी गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करत, श्रीलंकेचा डाव 169 धावांवर रोखला. श्रीलंकेकडून एकटे अर्जुन रणतुंगा अर्धशतक झळकावू शकले. गुरुसिम्हा व कर्णधार दुलीप मेंडीस यांनी प्रत्येकी 36 व 37 धावांचे योगदान दिले.
आज एकदिवसीय सामन्यामध्ये साडेतीनशे-चारशे धावा सहजरीत्या होत असल्या तरी, 33 वर्षांपूर्वी अशी मेजवानी क्वचितच मिळत. रिचर्ड्स यांच्या खेळीमुळे ही दुर्लभ मेजवानी त्यावेळी, कराचीतील स्टेडियममध्ये हजर असणाऱ्या व टेलिव्हिजनवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना नक्कीच मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशने केला अपसेट! विश्वविजेत्या इंग्लंडवर दणदणीत मात, शाकिबची अष्टपैलू कामगिरी
दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये नवी सुरुवात! युवा खेळाडूकडे नेतृत्व, तर दिग्गजाकडे प्रशिक्षकपद